अहमदाबाद - आधार कार्डला बँक खात्यांशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी टीका केली आहे. आता आधार कार्ड स्विस बँकेतील खात्यांशी कधी जोडले जाईल याचा विचार मी करत आहे. असा टोला हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून लगावला आहे. 
हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून भाजपावर निशाणा शाधला आहे. ते म्हणतात, आधार कार्डला मोबाइल आणि बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य बनवून सरकार बेरोजगारीसारख्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल भाजपाविरुद्ध पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसोबतची त्यांची कथित भेट आणि अन्य काँग्रेस नेत्यांसोबत सुरू असलेल्या बैठकांमधून तसे संकेत मिळत आहेत. 
दरम्यान, सुरेंद्रनगरमध्ये आरक्षण, शेतकरी आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवरून बोलावलेल्या सभेस लाखो लोकांनी लावलेली उपस्थिती मला ही लढाई अधिक भक्कमपणे लढण्याची प्रेरणा देत आहे. लोकांच्या मनात सरकारविरोधात राग आहे. ही जनता माझ्यासोबत नाही. तर मुद्द्यांच्या लढाईसोबत आहेत."असे हार्दिक पटेल म्हणला.  
हार्दिक पटेल यांनी हे ट्विट काळ्या पैशाबाबत पॅराडाइज पेपरमधून झालेल्या खुलाशानंतर केले आहे. जर्मनीतील  'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्रानं काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे. या वृत्तपत्रानं 'पॅराडाइज पेपर्स' उजेडात आणले आहेत. याच वृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासा केला होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96 नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चा खुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापर करत होते.  
 दरम्यान, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.  गुजरातमध्ये दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळेच सध्या गुजरातमधील भाजपा आणि मोदींच्या विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.