Whatsapp closes with the new year's reception, the problem of sending the wishes to the wishers | नववर्षाच्या स्वागतालाच व्हॉट्सअॅप बंद, शुभेच्छा पाठवणाऱ्यांचा झाला खोळंबा

नवी दिल्ली  - अगदी सहजपणे संदेशांचे देवाण घेवाण करता येत असल्याने व्हॉट्सअॅप हे मोबाइल युझर्सची गरज बनले आहे. मात्र आज नववर्षाच्या स्वागताच्या प्रसंगीच व्हॉट्सअॅपने दगा दिला. नव्या वर्षाला सुरुवात होऊन अवघी दहा मिनिटे झाली असताना भारतातील व्हॉट्स अॅप बंद पडले. त्यामुळे नववर्षानिमित्त आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठवणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नववर्षाच्या स्वागतादिवशीच व्हॉट्सअॅप बंद पडण्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे. याआधी 1 जानेवारी 2016 रोजी व्हॉट्स अॅप बंद पडले होते. अखेर सुमारे 30 मिनिटांनंतर रात्री एकच्या सुमारास व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले. 
 अगदी साध्या चॅटिंगपासून ते तातडीने महत्त्वाचा मेसेज देण्यापर्यत व्हॉट्सअॅप हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात व्हॉट्सअॅपविना मिनिटभर राहण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अशा परिस्थितीत रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी व्हॉट्स अॅप बंद झाले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला इंटरनेट सेवेतील व्यत्यय किंवा मोबाइलमध्ये काही बिघाड झाल्याने असे झाले असावे, असे सगळ्यांना वाटले, पण नंतर संपूर्ण देशभरात व्हॉट्स अॅप बंद झाल्याची माहिती इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मिळू लागली.  ही सेवा हॅक तर झाली नाही ना अशी भीतीही व्यक्त होऊ लागली होती. व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नोव्हेंबर आणि सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते.  त्याआधी 2016 साली नववर्षाच्या सुरुवातीलाच व्हॉट्स अॅप डाऊन झाले होते. तेव्हाही सुमारे पाऊण तास व्हॉट्सअॅप बंद असल्याने युझर्सला त्रास सहन करावा लागला होता.