War on the border does not end, Pakistan losses three to four times more | सीमेवरचं युद्ध इतक्यात संपणार नाही, पाकिस्तानचं तीन ते चार पट जास्त नुकसान
सीमेवरचं युद्ध इतक्यात संपणार नाही, पाकिस्तानचं तीन ते चार पट जास्त नुकसान

ठळक मुद्दे2017 मध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर 860 वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 120 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. आपली जितकी जिवीतहानी झालीय त्यापेक्षा तीन ते चारपट जास्त जिवीतहानी पाकिस्तानात झाली आहे.

नवी दिल्ली -     सीमेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला आता फक्त शस्त्रसंधीचे उल्लंघन म्हणता येणार नाही. कारण सीमेवरची सध्याची परिस्थिती, तणाव पाहता त्याला मर्यादीत स्वरुपाचे युद्धच म्हणावे लागेल.  सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्कराने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव मोठया प्रमाणावर वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये 778 किलोमीटरची नियंत्रण रेषा असून 198 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. 

2017 मध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर 860 वेळा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 120 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या 36 दिवसात 241 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून यात आपले नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात आपली जितकी जिवीतहानी झालीय त्यापेक्षा तीन ते चारपट जास्त जिवीतहानी पाकिस्तानात झाली आहे असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला जशास तसे उत्तर देण्यावर भारत सरकार ठाम असून दोन्ही बाजू तोफखाना, मोर्टार, रणगाडाविरोधी मिसाइलचाही वापर करत आहेत. हे सर्व इतक्यात संपणारे नाही. रविवारी राजौरीमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात कॅप्टनसह तीन जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाचे वातावरण आहे. उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सरथ चंद यांनी पाकिस्तानला या कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. जास्त काहीही न बोलता प्रत्युत्तर दिले जाईल. मला काही बोलायची गरज नाही. आमची कृतीच सर्व काही  बोलेल असे चंद म्हणाले. 

पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे सीमा रेषा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील २४ गावे पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत, तसेच ८४ शाळाही ३ दिवसांपासून बंद आहेत. हल्ल्याच्या भीतीने लोकांचे स्थलांतर सुरू असून, पाकला त्यांच्या घरात घुसून संपवा, अशी मागणी स्थानिकही करीत आहेत. आतापर्यंत ९0 स्थानिक पाकच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि भारतीय सैन्यदलाचे उपप्रमुख ले. जनरल शरत चंद यांनी आम्ही गप्प बसणार नाही आणि पाकला धडा शिकवू, असा इशारा दिला आहे. ले. जनरल शरत चंद म्हणाले की, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे. बदला न सांगता घेतला जात असतो. आम्ही अधिक बोलणार नाही. आमची कारवाईच काय ते बोलेल. अतिरेक्यांच्या घुसखोरीला पाकिस्तानी सैन्याची फूस असल्याचे सांगून, ते म्हणाले की, पाकिस्तानला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत, ‘भारतीय सैन्याच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.


Web Title: War on the border does not end, Pakistan losses three to four times more
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.