ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17- भाजपानं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी व्यंकय्या नायडूंच्या नावाची घोषणा केली आहे. उद्या सकाळी 11 वाजता व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरतील, असंही अमित शाहांनी सांगितलं आहे. व्यंकय्या नायडू लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षाचं काम करत आलेत, व्यंकय्या नायडूंना 25 वर्षांच्या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही व्यंकय्या नायडूंच्या नावाला सहमती दर्शवली आहे, असंही अमित शाहा म्हणाले आहेत. 

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय मंत्री आणि दक्षिणेतला भाजपाचा मोठा चेहरा म्हणून एनडीएकडून व्यंकय्या नायडूंचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिणेत भाजपाला मजबूत करण्यासाठी व्यंकय्या नायडूंना उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरवल्याची चर्चा आहे.  व्यंकय्या नायडू हे संघाचे कार्यकर्ते आहेत. भाजपामध्ये त्यांच्याकडे ज्येष्ठ आणि जाणकार नेते म्हणून पाहिलं जातं. ब-याचदा भाजपा पक्ष अडचणीत सापडलेला असताना व्यंकय्या नायडू बचावासाठी पुढे येऊन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच सर्वपक्षीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

आणखी बातम्या वाचा