Vice-President Sharad Yadav and Ali Anwar's Rajya Sabha membership canceled | उपराष्ट्रपतींनी केले शरद यादव आणि  अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द

नवी दिल्ली - संयुक्त जनता दलामध्ये बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या शरद यादव आणि अली अन्वर यांचे राज्यसभा सभासदत्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रद्द केले आहे. संयुक्त जनता दलाने या दोन्ही नेत्यांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. 
राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार संविधानामधील दहाव्या अनुसूचीमधील परिच्छेद 2 (1) (अ) मधील तरतुदीनुसार दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेतील नेते आर. सी. पी. सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अली अन्वय यांच्या कार्यकाळाचे पाच महिने शिल्लक होते. तर शरद यादव यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. संयुक्त जनता दलाने भाजपासोबत पुन्हा घरोबा केल्यापासून शरद यादव यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. तसेच शरद यादव यांनी पक्षाचा आदेश धुडकावत लालूप्रसाद यादव यांच्या पाटण्यातील २७ ऑगस्टच्या रॅलीला हजेरी लावली होती. त्यानंतर पक्षशिस्त मोडल्याचा आरोप करून त्यांच्याविरोधात अपात्रतेची तक्रार करण्यात आली होती.