पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल, मुस्लिमांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 05:02 PM2019-05-22T17:02:18+5:302019-05-22T17:02:35+5:30

उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांना गाव सोडून जाण्याची भीती सतावते आहे.

uttar pradesh muslims plan leave village modi gets second term | पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल, मुस्लिमांची भावना

पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल, मुस्लिमांची भावना

Next

लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांना गाव सोडून जाण्याची भीती सतावते आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बुलंदशहरमधील या गावात राहणाऱ्या मुस्लिमांच्या मते, गावात हिंदू-मुस्लिम एकमेकांशी बोलत देखील नाहीत. पहिल्यांदा अशी परिस्थिती नव्हती. मुस्लिम मुलंही हिंदूंच्या मुलांशी खेळायचे. परंतु आता मुस्लिम घाबरलेले असून, त्यांच्यामते 2 वर्षांत दोन्ही समाजांत मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. रॉयटर्सशी बोलताना गावातल्या मुस्लिम व्यक्तीनं सांगितलं की, जर भाजपा पुन्हा जिंकला आणि मोदी पंतप्रधान झाले, तर हा दोन्ही समाजातील तणाव पराकोटीला जाऊ शकतो.

गावात छोटंसं दुकान असलेले गुलफाम अली म्हणाले, पहिल्यांदा परिस्थिती चांगली होती. मुस्लिम-हिंदू सलोख्यानं राहत होते. वाईट काळातही एकमेकांसोबत असायचे. पण मोदी आणि योगींनी सर्वच परिस्थिती बिघडवून टाकली आहे. आम्हाला ही जागा सोडायची आहे,  मात्र आम्ही असं करू शकत नाही. अली सांगतात, जवळपास एक डझन मुस्लिम कुटुंबांनी गेल्या दोन वर्षांत गाव सोडलं. भाजपानं या गावात अशी काही परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे. गेल्या वर्षी बुलंदशहरमधल्या याच भागात काही हिंदूंनी तक्रारी केल्या होत्या की, त्यांनी मुस्लिमांना गायीला कापताना पाहिलं होतं. त्यानंतर जमावानं एका पोलीस अधिकाऱ्यांचीही हत्या केली होती. 4 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नयाबांस गावात जवळपास 400 मुस्लिम राहतात. परंतु 5 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसेच्या छायेतून गाव अद्याप बाहेर आलेलं नाही.


भाजपाचे प्रवक्ते गोपाल अग्रवाल म्हणाले की, त्यांचं सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे या घटनांना हिंदू-मुस्लिम वाद म्हणणं चुकीचं आहे. नयाबांस गावात इतिहासातही अनेक दंगली झाल्या आहेत. 1977मध्ये मशीद बनवण्याच्या प्रयत्नात दंगली उसळल्या होत्या. ज्यात 2 लोकांचा मृत्यू झाला होता. परंतु गाववाल्यांच्या मते गेल्या 40 वर्षांपासून इथली जनता सामंजस्यानं राहते आहे. काही मुस्लिमांच्या मते, योगी सरकार आल्यानंतर कट्टर हिंदू अधिक आक्रमक झाले आहेत.  
 

Web Title: uttar pradesh muslims plan leave village modi gets second term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.