देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 07:42 AM2018-09-21T07:42:42+5:302018-09-21T07:42:54+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अनेक मुद्यांवरुन टीकास्त्र सोडले आहे.

Uddhav Thackeray's reaction on Mohan Bhagwat's Ram temple speech | देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

Next

मुंबई  - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर अनेक मुद्यांवरुन टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर देशाचे भविष्य आणि येथील समस्यांसंदर्भात प्रश्नांचा भडीमार केला आहे. मुख्यतः राम मंदिर, कलम 370, गोवंश कायदा या मुद्यावरुन त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

''सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत. पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? त्यासाठी पुढची पन्नास वर्षे कुणाला राज्य हवे असेल तर सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत, पण आज सत्य बोलायला कुणी तयार नाही'', अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे : 
- सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत सांगितले की, अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर व्हायला हवे. 370 कलमाबाबत आमची भूमिका स्पष्ट असल्याचे भागवत म्हणतात. 370 कलम हटवल्याशिवाय कश्मीर हा हिंदुस्थानचा भूभाग होणार नाही अशी संघाची भूमिका होती व त्या मतांशी ते कायम असतील तर 370 कलम हटविण्यास विरोध करणार्‍या मेहबुबा मुफ्तीसोबत कश्मिरात भाजपने सरकार स्थापन केले त्याचे काय? 
- 370 कलम हटवले तर दंगे उसळतील असे मेहबुबांचे सांगणे होते. तरीही तिच्याशी सत्तेसाठी निकाह लावणे योग्य होते काय व हा निकाह लावण्यात ‘काझी’ची भूमिका पार पाडणारे राम माधव यांच्यासारखे संघ स्वयंसेवकच होते. 
- राम मंदिर व्हायला हवे असे सरसंघचालक सांगतात ते दिल्लीतील मोदी सरकारने गांभीर्याने घ्यायला हवे, पण राम मंदिर हा प्रचाराचा आणि निवडणुकीचा मुद्दा बनला आहे आणि त्यामुळे हिंदुत्व चेष्टेचा विषय बनत चालला आहे. 
- उत्तरेतील एका भाजपच्या नेत्याने तर अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, खुद्द पंतप्रधान मोदीही हादरले असतील. सुप्रीम कोर्टात भाजपचे वजन आहे. त्यामुळे राम मंदिरप्रश्नी आम्ही न्यायालयातून पाहिजे तसा आदेश घेऊन येऊ. 
- राम मंदिर हा सेटिंग, मांडवली किंवा व्यापार आहे काय हे आधी स्पष्ट व्हायला हवे. 
- सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? 
-  पेट्रोल, डिझेलची महागाई आणि जवानांचे शिरच्छेद हेच हिंदुस्थानचे भविष्य आहे काय? 
- गोरक्षणाच्या नावावर जो उन्माद झाला, माणसे मारली गेली. त्याच्याशी संघाचा संबंध नाही असे  श्री. भागवत यांनी सांगितले, पण गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी हिंसा करायला रस्त्यावर उतरल्या तेव्हा हिंदू मतांच्या धुवीकरणाची नवी पहाट उगवल्याच्या आनंदात सगळे बेहोश झाले. 
- गाय, गोवंश वगैरेंचा संबंध हिंदुत्वापेक्षा शेतकर्‍यांच्या अर्थकारणाशी आहे हे त्यावेळी एखाद्या ज्येष्ठाने समजावून सांगितले असते तर शेतकर्‍यांचे भले झाले असते. 
-  सामान्य माणसांचेच खायचे वांदे झाले तेथे भाकड गाई-बैलांची काय कथा? उलट त्यांच्यासाठी आता शेतकर्‍यांना तजवीज करावी लागत आहे. हे चित्र हिंदूंच्या भविष्यासाठी बरे नाही. देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये.

Web Title: Uddhav Thackeray's reaction on Mohan Bhagwat's Ram temple speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.