जम्मू-काश्मीर, दि. 12 - जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियन जिल्ह्यातील अवनीरा गावात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, लष्काराच्या जवानांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु आहे. तर, दुसरीकडे कुपवाडा परिसरात सुद्धा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जखमी जखमी झाला आहे. 


पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद...
नियंत्रण रेषेवरील पूंछ क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाक सैनिकांनी भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार केला. त्यात नायब सुभेदार जगरामसिंग तोमर (42) हा शहीद झाला. हा जवान मध्यप्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील तारसाना गावचा रहिवासी आहे. त्याच्या मागे पत्नी उमावती देवी, मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या पाच दिवसांत सीमेवर धारातीर्थी पडलेला तो दुसरा जवान आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.