Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने कूच?... डाव्यांना धक्का, काँग्रेसला 'भोपळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 10:54 AM2018-03-03T10:54:40+5:302018-03-03T13:50:44+5:30

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. मेघालय वगळता काँग्रेस कोठेच आपले अस्तित्व दाखवू शकत नसल्याचे या निकालांचे सुरुवातीचे कल सांगत आहेत.

Tripura Election 2018 : Tight Contest in Tripura, BJP in the direction of victory? | Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने कूच?... डाव्यांना धक्का, काँग्रेसला 'भोपळा'

Tripura Election 2018 : त्रिपुरामध्ये भाजपाची विजयाच्या दिशेने कूच?... डाव्यांना धक्का, काँग्रेसला 'भोपळा'

Next

आगरतळा - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमधील विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. मेघालय वगळता काँग्रेस कोठेच आपले अस्तित्व दाखवू शकत नसल्याचे या निकालांचे सुरुवातीचे कल सांगत आहेत. मेघालयमध्येही मावळत्या विधानसभेत काँग्रेस पक्षाला लागलेली गळती पाहता तेथेही या पक्षाला फारसे आशादायी चित्र दिसत नाही. गेली २५ वर्षे त्रिपुरात तळ ठोकून बसलेल्या डाव्यांच्या गढीला धक्का देण्याची कल्पना भाजपाच्या नेतृत्वाने मांडली आणि तसा पद्धतशीर आराखडाही तयार केला. भाजपाचे सुनील देवधर हे गेली चार ते पाच वर्षे या राज्यात तळ ठोकून आहेत. ज्या राज्यात एकही जागा गेल्या विधानसभेत जिंकता आली नव्हती आणि जेथे डाव्यांचा अभेद्य किल्ला होता अशा ठिकाणी भाजपाने पाय रोवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले.

मात्र काँग्रेसने डाव्यांना विरोध करण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम राबविला नाही. डाव्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे ६० जागांच्या विधानसभेत १० आमदार होते तरीही काँग्रेसने डाव्यांना पर्याय म्हणून उभे राहण्यासाठी फारसे काही केले नाही. यामुळे निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा भाजपाने मात्र घेतला. होय, डाव्यांचं सरकार उलथवता येऊ शकतं, असं सांगत रस्त्यावर उतरुन जनमत आपल्या बाजूने आणण्यासाठी भाजपा कार्यरत राहिला. भाजपाने शून्यातून येऊन एवढी मोठी झेप घेणे आश्चर्य वाटायला लावणारी आहेच. 

दुसरीकडे काँग्रेस मात्र आपण स्पर्धेतच नाही, ही निवडणूक जणू माकपा आणि भाजपा यांच्यामध्ये सुरू असल्याच्या थाटात शांत राहिली. डाव्यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात किंवा त्याचे मतांमध्ये रुपांतर करण्यात काँग्रेसने हालचाल केली नाही. त्याचाच परिणाम आता मतमोजणीत दिसत आहे. एकेकाळी त्रिपुरामध्ये सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष माकपाच्या पंचविस वर्षात प्रभावहीन झाला होता पण निवडणुकीच्या निमित्ताने आव्हान देण्याची संधी या पक्षाने घालवली असे वाटते. गेल्या विधानसभेत माकपाचे ४९ आमदार होते त्यामुळे आता जाहीर होत असलेल्या मतमोजणीत माकपाला हा हादरवणारा निकाल आहे हे मात्र निश्चित.
 

Web Title: Tripura Election 2018 : Tight Contest in Tripura, BJP in the direction of victory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.