बंगळुरू : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने वरिष्ठ अधिकारी विनयकुमार यांची नेमणूक केली आहे. चौकशी होईपर्यंत ज्यांच्यावर आरोप झाले, त्या सत्यनारायण राव यांच्याकडील पोलीस महासंचालक (तुरुंग)पदाची सूत्रे काढून घेण्यात आली आहेत. तसेच आरोप करणाऱ्या उपमहानिरीक्षक डी. रूपा यांची बदली वाहतून शाखेत करण्यात आली आहे.
सत्यनारायण राव यांना सध्या कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. ते या महिनाअखेरीस निवृत्त होणार आहेत. शशिकला
यांना व्हीआयपी वागणूक
मिळण्यास ते जबाबदार असल्याचा आरोप आहे. डी. रूपा यांनी आरोपासंबंधीचे पत्र परस्पर प्रसिद्धी माध्यमांकडे दिल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे.

काय होते आरोप?
डी. रुपा यांनी अधिकारी तुरुंगात बेकायदा गोष्टी करण्यास परवानगी देत असल्याचा आरोप केला होता. शशिकला यांना स्वयंपाकासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा आरोपी अब्दुल करीम तेलगी यालाही सवलती मिळत आहेत, याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.