सोनिया गांधींच्या विश्वासातील टॉम वडक्कन भाजपामध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:26 AM2019-03-15T04:26:30+5:302019-03-15T04:26:54+5:30

प्रचंड दुखावल्यानेच केले पक्षांतर

Tom Vadakkan in Sonia Gandhi's faith | सोनिया गांधींच्या विश्वासातील टॉम वडक्कन भाजपामध्ये दाखल

सोनिया गांधींच्या विश्वासातील टॉम वडक्कन भाजपामध्ये दाखल

Next

नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले व काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गुरुवारी भाजपात प्रवेश केला. बालाकोटवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने घेतलेली भूमिका अतिशय चुकीची होती, अशी टीका वडक्कन यांनी केली.

केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाप्रवेश केला. त्यानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सांगितले की, काँग्रेसमध्ये मी प्रचंड दुखावला गेल्यानेच तुमच्याकडे आलो. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकचा हात होता. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी बालाकोटवर केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसने हवाई दलाच्या क्षमतेबाबतच शंका उपस्थित केली. त्यामुळे मी दुखावला गेलो व पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रहिताच्या विरोधात पक्ष काम करत असेल तर त्याला रामराम ठोकणे हा एकच पर्याय शिल्लक राहातो. घराणेशाहीचे राजकारण काँग्रेसमध्ये कळसाला पोहोचले आहे. या पक्षासाठी मी सुमारे वीस वर्षे काम केले. पण राहुल गांधी अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसमध्ये ‘वापरा व फेकून द्या' ही नवी संस्कृती रुजू लागली आहे.

केरळमधून उमेदवारी?
भाजपा वडक्कन यांना केरळमधील थ्रिसूर, एर्नाकुलम, इडुक्की यापैकी एका जागी लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जे आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करत होते तेच आता त्या पक्षात गेले अशा शब्दांत काँग्रेसने वडक्कन यांच्यावर टीका केली होती.

Web Title: Tom Vadakkan in Sonia Gandhi's faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.