पत्रकार बुखारींच्या अंत्यसंस्काराला हजारो उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:53 AM2018-06-16T05:53:25+5:302018-06-16T05:53:25+5:30

जम्मू-काश्मीरमधील ख्यातनाम पत्रकार व रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे मुख्य संपादक शुजात बुखारी यांच्या पार्थिवावर बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हजारो लोकांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.

Thousands attend the funeral of journalist Bukhari | पत्रकार बुखारींच्या अंत्यसंस्काराला हजारो उपस्थित

पत्रकार बुखारींच्या अंत्यसंस्काराला हजारो उपस्थित

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील ख्यातनाम पत्रकार व रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे मुख्य संपादक शुजात बुखारी यांच्या पार्थिवावर बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हजारो लोकांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.
काश्मीर खोऱ्यातील दूरदूरच्या गावांतून चाहते, वाचक त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला तसेच पीडीपी व भाजपाच्या मंत्र्यांनी क्रिरी येथील घरी जाऊन बुखारी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती व जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी देखील बुखारी यांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हत्येचा निषेध करताना, काश्मीरमधील दहशतवाद मोडून काढण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.
प्रेस गिल्ड आॅफ इंडिया तसेच देशभरातील अनेक पत्रकार संघटनांनीही शुजात बुखाली यांच्या हत्येचा निषेध केला आहे. प्रसारमाध्यमांवरच हा हल्ला आहे, असे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे. काश्मीरमधील पत्रकारांना तिथे काम करणे अतिशय अवघड झाले असून, बातम्या देताना त्यांच्यावर दबाव येतो आणि काही बातम्या प्रसिद्ध
करू नयेत, यासाठी धमक्या दिल्या जातात, असे पत्रकार संघटनांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

अभिनव आदरांजली : मुख्य संपादकांची हत्या झाल्यानंतरही रायझिंग काश्मीर या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी गुरुवारी निर्धाराने आपले काम सुरुच ठेवले. शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बुखारी यांना आगळ््यावेगळ््या स्वरुपात श्रद्घांजली वाहण्यात आली. काळ््या पार्श्वभूमीवर बुखारी यांचे पानभर छायाचित्र छापण्यात आले. ‘कितीही कठीण प्रसंग आले तरी आम्ही डगमगणार नाही. ज्या भ्याड लोकांनी बुखारींची हत्या केली त्यांच्यापुढे आम्ही कधीही झुकणार नाही' असे या वृत्तपत्राने बुखारींना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

बुखारी यांची हत्या
हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील घाला आहे असे माकपचे नेते एम. वाय. तरिगामी यांनी म्हटले आहे. बुखारी व त्यांच्या दोनपैकी एका सुरक्षा रक्षकाची श्रीनगरमधील रायजिंग काश्मीर या
इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर गोळ््या झाडून गुरुवारी हत्या करण्यात आली होती. या कृत्याचा तीव्र निषेध करुन कुलगामचे आमदार एम. वाय. तरिगामी यांनी म्हणाले आहे की, पत्रकारांची हत्या करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. उलट ते प्रश्न अधिकच गंभीर होतील.

 

Web Title: Thousands attend the funeral of journalist Bukhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.