घरफोड्या आल्याचे समजल्यावर त्या कुटुंबाला प्रचंड दहशत बसली परंतु चोर किंवा घरफोड्या नव्हता तर नऊ फुटांची मगर १५ फुटांचा जिना चढून दुसऱ्या मजल्यावर जाळीच्या दारातून घरात आली होती. सुसी आणि स्टीव्ह पोल्स्टन आणि त्यांच्या १६ वर्षांच्या मुलाला महाकाय मगर सोफा आणि झोपाळा जबड्यात घ्यायचा प्रयत्न करीत होती, असे डेली मेलने म्हटले. हे कुटुंब दबकत दबकत झोपायच्या खोलीत गेले. त्यांच्या मुलाने खोलीच्या बाहेर डोकावून बघितले तेव्हा त्याला मगरीने फर्निचर उलथून टाकलेले व ती खायला काय मिळते हे इकडेतिकडे बघत असल्याचे दिसले. सुसीने सांगितले की ते सगळे दृश्य विलक्षण परंतु खरेखुरे होते. या कुटुंबाने जनावरांचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीला बोलावले परंतु त्यांच्याकडील तज्ज्ञ घरी येईपर्यंत ती मगर आक्रमक बनत गेली. तेथील कायद्यानुसार अशा रितीने अडकलेल्या जनावराला मारून टाकले जाते. पण या कुटुंबाने या कंपनीला या मगरीला मारून टाकू नका, अशी विनंती केली व तोपर्यंत त्या संकटाला तोंड द्यायची तयारीही दाखवली.