संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 07:28 AM2018-10-06T07:28:30+5:302018-10-06T09:21:00+5:30

गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे.

 ... then 'Ekla Chalo Re' | संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

Next

मायावतीनी तोंड फिरविले आहे. अखिलेशचे तोंड अजून उघडले नाही. चंद्रशेखर राव यांनी शिवीगाळ केली आहे. चंद्राबाबूंची बाजू उघड व्हायची आहे. डाव्यांचे हटवादीपण पूर्वीही अधिक कडवे आणि काँग्रेसविरोधी बनले आहे. नवीन पटनायक त्यांचे पत्ते अजून कुणाला दाखवित नाहीत आणि नितीशकुमार सरळसरळ भाजपात गेलेच आहे. ‘आप’चे बारके स्वरूप, तसेच पण अधिक कडक होताना दिसत आहेत. ममता बॅनर्जींना कुणीतरी त्यांच्या पक्षाचा दरवाजा ठोठावील, याची वाट आहे. जोगींनी पक्षांतर केले आहे. मुलायमांना महत्त्व नाही आणि शरद पवार अविश्वसनीय आहे. या स्थितीत लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल आणि स्टॅलिनचा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांखेरीज काँँग्रेससोबत जायला आज तरी दुसरा पक्ष सरळपणे तयार असल्याचे दिसत नाही. निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला असतानाची भाजपाविरोधकांची देशातील ही स्थिती आहे. गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे. देशात एवढे प्रश्न आहेत, अर्थव्यवस्था कोसळली आहे, सेन्सेक्स हजारोंनी कोसळला आहे, बँका बुडाल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे आणि महागाई आकाशाला भिडली आहे, शिवाय घोटाळे आहेत.

राफेल घोटाळ्याची व्याप्ती वा आकार एवढा की, त्याने आजवरचे सारे घोटाळे लहान ठरवून मागे टाकले आहेत, पण त्यावर भाष्ये नाहीत. एकटे राहुल गांधी, खरगे, मनमोहन सिंग वा त्यांचे सहकारी सोडले, तर बाकीचे पुढारी देशात जणूकाही सारे ‘आॅलवेल’ असल्याच्या थाटात आहेत. या स्थितीत देश चार राज्यांतील निवडणुकांना लगेच व लोकसभेच्या निवडणुकीला काही महिन्यांत तोंड देत आहेत. भाजपाला संघटित विरोध झाला, तर त्याचा पराभव होऊ शकतो, असे सारे म्हणतात, पण ते संघटित होताना मात्र दिसत नाहीत. आपापले बळ आजमावून पाहण्याची व तसे करताना आपटी खाण्याची तयारी केलेलीच ती साऱ्यांना दिसत आहे. परिणामी, देशात समस्या वाढत असताना, त्याची काळजी करण्याऐवजी भाजपाचे पुढारी व मंत्री विरोधकांच्या न होणा-या ऐक्यामुळे आनंदात आहेत. मात्र, हा आत्मशक्तीच्या परीक्षेचा प्रकार नसून आत्महत्येचा प्रकार आहे. एक-एकटे मरणार आणि संघटना केली, तरच तरणार, अशी विरोधकांची स्थिती असल्याचे सगळ्या आकडेशास्त्र्यांचे व जाणकारांचे म्हणणे आहे. २०१४ च्या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही, असे वाटल्यामुळेच आम्ही देशाला भरमसाठ आश्वासने दिली व आता ती पूर्ण होत नाहीत, असे एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने परवा म्हटले. ती खरोखरच पूर्ण होणार नाहीत. बुलेट ट्रेन वेळेत धावणार नाही, मेट्रोचे सांगाडे पूर्ण होणार नाहीत आणि नागपूरच्या नागनदीतून जहाजेही चालणार नाहीत. उद्योग बंद व्हायचे थांबत नाहीत, मिहानचे मढे जिवंत होत नाहीत, कारखाने येत नाहीत, म्हणून रामदेवबाबाला सौंदर्य प्रसाधने बनविण्यासाठी जागा द्यायला सरकारही थांबत नाही. मग या चार वर्षांत झाले काय? राममंदिर राहिले, गंगा व यमुनेतही अनेक जागी तीन-तीन फूट पाणी शिल्लक राहिले, हिवाळा आला, तरी पाण्यात शोध सुरू आहे आणि उन्हाळा दूर असतानाच विजेच्या पुरवठ्यात कपात होत आहे. मोठे घोटाळे थांबले नाहीत. विरोधक एक होत नसतील आणि स्थिती अशीच राहत असेल, तर मग राहुल गांधी आणि काँग्रेस यांनाच त्यांचे बळ वाढविणे भाग आहे. ते बळ त्यांना परवा गांधीजींनी दिल्याचे दिसले आहे. ही स्थिती ‘एकला चलो’ असे सांगणारी आहे. तुम्ही याल, तर तुमच्यासोबत नाही, तर तुमच्याशिवाय असे म्हणत पुढे जाण्याची व भाजपाला स्वबळावर तोंड देण्याची स्थिती सांगणारी ही बाब आहे. वर्षभरात काँग्रेसने बराच उत्साह जोडला आहे. त्या पक्षात नवी माणसेही आली आहेत. हे बळ वाढले, तरच २०१९च्या निवडणुका त्याला समर्थपणे लढविता येणे शक्य होणार आहे.

भाजपाला संघटित विरोध झाला, तर त्याचा पराभव होऊ शकतो, असे सारे म्हणतात, पण ते संघटित होताना मात्र दिसत नाहीत. आपापले बळ आजमावून पाहण्याची व आपटी खाण्याची तयारी केलेलीच साºयांना दिसत आहे.

Web Title:  ... then 'Ekla Chalo Re'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.