ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - टेलिकॉम इंडस्ट्रीत आलेल्या विलीनीकरणाच्या लाटेमुळे जवळपास 25 हजार नोक-यांवर कु-हाड पडणार आहे. दोन कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे टेलिकॉम सेक्टर प्रभावित होऊन अनेकांवर नोक-या गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. एका कंपनीच्या एचआर हेडच्या मते, या एकत्रीकरणामुळे हेड ऑफिस आणि सर्कल(ऑफिस)मध्ये काम करणा-या अधिका-यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम आहे. जवळपास 10 हजार ते 25 हजार नोकर कपात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून, त्यांची संख्या 1 लाखांच्याही घरात जाऊ शकते, असं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर जवळपास 3 लाखांहून अधिक लोक अवलंबून आहेत. मात्र कंपन्यांच्या विलीनीकरणामुळे एक तृतीयांश लोकांना स्वतःची नोकरी गमावावी लागणार आहे. 2017 या वर्षात आयडिया आणि व्होडाफोननं एकत्रीकरण केलं आहे. तसेच एअरसेल आणि रिलायन्स कम्युनिकेशन(आर कॉम)ही विलीनीकरण केलं आहे.

दरम्यान, काही पैसे जमवण्यासाठी मी माझ्या मुलासोबत जाणारा विदेश दौरा रद्द केला आहे, असं एका अधिका-यानं सांगितलं आहे. एका रिपोर्टनुसार, आयडिया, व्होडाफोन, आर कॉम आणि एअरसेलमध्ये जवळपास 48 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एकत्रीकरणामुळे कंपनीचे सर्कल प्रमुख, मनुष्यबळ विकास आणि आर्थिक टीम प्रभावित होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांचा महसूल 4 ते 4.5 टक्के कर्मचा-यांवर खर्च होतो. मात्र त्याचा खरा प्रभाव सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनवर पडणार आहे. मोठ्या कंपन्यांचा 22 टक्के खर्च हा सेल्स आणि डिस्ट्रीब्युशनवर होतो, असं एका एचआरनं सांगितलं आहे.