'The Tashkent files' ... Another attack on the Congress | ‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला
‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला

ठळक मुद्देलालबहादूर शास्त्रींच्या गुढ मृत्यूवर प्रश्नचिन्ह सरदार पटेल, डॉ. मनमोहन सिंगप्रमाणेच अन्याय केल्याचा दावा

-अविनाश थोरात-
पुुणे: ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करून कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या गुढ मृत्यूचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून त्याची चौकशी का झाली नाही असा सवाल करण्यात आला आहे. 
विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द ताश्कंद फाईल्स ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा पंतप्रधान ताश्कंदला जातो, शांतता करारावर सह्या करतो आणि तेथेच मृत्यू पावतो. शेकडो संशयित असतात. तरी या मृत्यूची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोगही नेमला जात नाही. या वाक्यांनी ट्रेलरची सुरूवात होते. शास्त्रीजी वारले की त्यांना मारण्यात आले? ह्रदयविकाराचा झटका होता की खून... 

अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने न्यायालयीन चौकशी मागणी केल्यानंतरही ती का करण्यात आली नाही?ह्ण असे सवाल करण्यात आले आहेत. 
एका  पंतप्रधानाला विष दिले जाते, संसदेवर हल्ला केला जातो, मुंबईमध्ये बॉँबस्फोट होतात. पण काहीही  बोलू नका...धर्मनिरपेक्षता आहेह्णया एका पात्राच्या  तोंडच्या संवादातून कॉँग्रेसवर थेट टीका केली आहे. हा गांधी आणि नेहरूंचा देश आहे, असे एक पात्र म्हटल्यावर शास्त्रीजींचा का नाही? असा सवाल केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना कॉर्ग्रेसने वाईट वागणूक दिली, अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून केली जाते. द अक्सिडेंटल प्राईममिनिस्टर
चित्रपटाद्वारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा त्यांच्या इच्छेविरुध्द कॉँग्रेसने कठपुतळीप्रमाणे वापर केला असे दाखविण्यात आले. याच मालिकेत आता लालबहादूर शास्त्रींनाही जोडण्यात आले आहे. 

काय आहे ताश्कंद पेपर्स?
लालबहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान. पंडीत नेहरू यांच्या निधनानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९६५ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला.यानंतर रशियाच्या मध्यस्तीने शास्त्री आणि पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अयूब खान यांच्यात बैठक झाली. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या आताच्या उझबेकिस्थान या देशाची राजधानी ताश्कंद येथे ही बैठक झाली. शांतता करार झाल्यावर त्याच रात्री शास्त्री यांचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला होता. 

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर होते शास्त्रींबरोबर
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर हे लालबहादूर शास्त्री यांचे निकटवर्तीय होते. त्यावेळी नय्यर हे यूएनआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी होते. या नात्याने ते देखील शास्त्रींबरोबर ताश्कंदला गेले होते. आपल्या बिटविन द लाईन्स या आत्मचरित्रात नय्यर यांनी शास्त्रीजींच्या मृत्यूच्या घटनेचे वर्णन केले आहे. ते लिहितात, त्या मध्यरात्री दरवाजा ठोठावून एका महिलेने मला उठविले. तुमच्या पंतप्रधानांची तब्येत अचानक बिघडल्याचे सांगितले. मी घाईघाईत कपडे चढविले आणि एका शासकीय अधिकाऱ्याबरोबर शास्त्रीजींच्या ताश्कंदमधील निवासस्थानी निघालो. तेथे पोहोचल्यावर रशियाचे पंतप्रधान अलेक्झी कोसिजीन यांना व्हरांड्यात उभे असल्याचे पाहिले. त्यांनी हाताच्या खुणेनेच शास्त्रीजी हयात नसल्याचे सांगितले. व्हरांड्यांच्या मागे असलेल्या डायनिंग रुममध्ये डॉक्टरांचे एक पथक शास्त्रीजींबरोबर असलेल्या आर. एन. छुग यांची चौकशी करत होते. त्याच्या समोरच शास्त्रीजींची प्रशस्त खोली होती. एका प्रचंड पलंगावर शास्त्रीजी निपचित पडलेले होते. कोपऱ्यातील टेबलवर एक अर्धवट उघडा थर्मास होता. शास्त्रीजींनी तो उघडायचा प्रयत्न केला असावा. या खोलीमध्ये नोकराला बोलावण्यासाठी बझर नव्हता. संसदेत विरोधकांनी प्रश्न केल्यावर सरकारकडून याबाबत खोटी माहिती सांगितली गेली होती. आमचा छायाचित्रकार आणि मी मिळून तिरंग्याने शास्त्रीजींचे पार्थिव व्यवस्थित झाकले. फुले वाहून श्रध्दांजली वाहिली. 
त्यानंतर मी शास्त्रीजींचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ सहाय्य यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितले की मध्यरात्रीच्या सुमारास शास्त्रीजींनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. त्यांना पाणी हवे होते. सहाय आणि दोन स्टेनोग्राफर शास्त्रीजींना सोडायला त्यांच्या दालनापर्यंत गेले. शास्त्रींच्या निधनाच्या वृत्ताचा फ्लॅश पाठविल्यावर मी आणखी माहिती घेण्यासाठी त्यांच्या सहाय्यकाच्या खोलीत गेलोे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वागत समारंभ संपल्यावर शास्त्रीजी त्यांच्या दालनात रात्री दहा वाजता पोहोचले. शास्त्रीजींनी आपला वैयक्तिक सहाय्यक रामनाथ याला जेवण आणण्यासाठी सांगितले. भारताचे रशियातील राजदूत टी. एन. कौल यांच्या घरून हे जेवण आले होते. पालकाचे सूप आणि बटाट्याची भाजी असे जेवण होते. त्यानंतर शास्त्रीजींना झोपण्यापूर्वी पिण्यासाठी रामनाथने दूध आणून ठेवले. त्यावेळी शास्त्रीजींना दम लागला आणि त्यांनी पिण्यासाठी रामनाथकडे पाणी मागितले. टेबलवरील थर्मासमधून रामनाथने पाणी दिले. त्यानंतर मध्यरात्री शास्त्रीजींनी रामनाथला त्याच्या खोलीमध्ये जाण्यास सांगितले. कारण त्यांनी सकाळी लवकर काबुलला जायचे होते. तेथेच खाली फरशीवर झोपू का असे रामनाथने विचारले. पण, शास्त्रीजींनी त्याला वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीमध्ये जाण्यास सांगितले. हे सगळे वरच्या खोलीत सामान बांधत असतानाच शास्त्रीजी त्यांच्या खोलीच्या दारात आले. त्यांनी कष्टाने विचारले की डॉक्टरसाहेब कोठे आहेत. त्यानंतर खोकल्याची एक उबळ येऊन शास्त्रीजी खाली कोसळले. जगन्नाथने त्यांना पाणी दिले आणि बाबूजी, आता आपल्याला बरे वाटेल असे सांगितले. पण तेवढ्यात छातीला हात लावण्याचा प्रयत्न करत शास्त्रीजी बेशुध्द पडले. मी ताश्कंदहून दिल्लीला आल्यावर शास्त्रीजींच्या पत्नी ललिता यांना विचारले की पार्थिव निळे का पडले आहे? त्यावर मी म्हणालो की खूप वेळ ठेवल्यावर पार्थिव निळे पडते. त्यानंतर शास्त्रीजींच्या शरीरावरील काही जखमांबाबत त्यांनी विचारले. परंतु, मला माहित नसल्याचे सांगितले. ताश्कंद किंवा दिल्लीमध्ये शवविच्छेदनच करण्यात आलेले नाही असे त्यांनी सांगितल्यावर मला धक्काच बसला. हे विचित्र होते.

त्यानंतर काही दिवसांनी मला समजले की ललिता शास्त्री या दोन्ही सहाय्यकांवर खूप रागावल्या आहेत. कारण त्यांनी शास्त्रींजा मृत्यू नैसर्गिक नाही असे वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. दिवस जात होते तसा शास्त्रीजींच्या कुटुंबियांचा विश्वास वाढत होता की त्यांना विष देण्यात आले आहे. कुटुंबियांना हे समजल्यावर धक्का बसला की रामनाथ असूनही शास्त्रीजींचे जेवण टी. एन. कौल यांचा खानसामा जान मोहम्मद बनवित होता. कॉँग्रेसमधील काही जुन्या नेत्यांनी नंतर शास्त्रीजींच्या मृत्यूच्या चौकशीला पाठिंबा द्यायला सुरूवात केली. त्यामध्ये मोरारजी देसाईही होते. १९७० साली मी त्यांना विचारले की खरोखरच शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत तुम्हाला शंका आहेत. त्यावर मोरारजी देसाई म्हणाले, यामध्ये काहीही काळंबेरं नाही. ते ह्रदयविकारानेच मृत्यू पावले. त्यांचे डॉक्टर आणि सचिव सी. पी. श्रीवास्तव यांच्याकडून मी शहानिशा करून घेतली आहे. हे सगळे राजकारण आहे... 


Web Title: 'The Tashkent files' ... Another attack on the Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.