भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 07:02 AM2019-05-09T07:02:06+5:302019-05-09T07:02:33+5:30

लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत.

Talks on the unity of anti-BJP parties, Chandrababu Naidu-Rahul Gandhi's visit | भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट

भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू, चंद्राबाबू नायडू-राहुल गांधी भेट

Next

- हरिश गुप्ता/संतोष ठाकूर

नवी दिल्ली - लोकसभेच्या २७२ जागा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्या पक्षाला अन्य लहान पक्षांची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात असल्याने, सावधगिरीचे पाऊल म्हणून काँग्रेस व मित्रपक्ष सक्रिय झाले आहेत. तेलगू देसमचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याला रवाना झाले.

राजकीय निरीक्षक व सट्टा बाजाराने भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठता येणार नाही, असे मत वर्तविले आहे. दुसरीकडे प्रसंगी अन्य पक्षांचा पाठिेंबा आम्ही मिळवू शकतो, असे भाजपचे सरचिटणीस राम मोहन व खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे विरोधक सावध झाले आहेत.
राहुल गांधी व चंद्राबाबू यांच्यात काय चर्चा झाली, ते समजू शकले नाही. मात्र, सत्ताधारी रालोआमध्ये नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी २३ मे रोजी सरकार स्थापनेसाठी एकत्र यावे, असा चंद्राबाबू यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने, त्या पक्षाने त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थिर सरकारसाठी प्रयत्न सुरू करावेत, अशी त्यांची इच्छा आहे.

काँग्रेसने समाजवादी पक्षाशीही चर्चा सुरू केल्याचे समजते. प्रियांका गांधी यांनी सपचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊ न त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, पण निवडणुकांनंतर सपने काँग्रेससोबत यावे, असे प्रियांका यांचे प्रयत्न आहेत. सप व काँग्रेस यापूर्वी एकत्र आले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यात अडचण येणार नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशात सप व बसप तसेच राष्ट्रीय लोक दल यांची आघाडी असून, त्यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभे केलेले नाहीत. बसपच्या नेत्या मायावती काँग्रेससोबत उघडपणे येतील का, याविषयी शंका असली तरी सप व राष्ट्रीय लोक दल यांचा काँग्रेसला पाठिंबा मिळू शकेल, असे सांगण्यात येते.

याशिवाय काँग्रेसचे नेते सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी पटनायक यांच्याशी चर्चा केल्याचे कळते. ओडिशामध्ये भाजपचे प्रस्थ वाढू देण्यापेक्षा काँग्रेसला पाठिंबा देणे बिजू जनता दलाला सोयीचे आहे. भाजपही त्यांच्या संपर्कात आहेत. चक्रीवादळानंतर तिथे पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान मोदी यांनी उघडपणे पटनायक यांचे कौतुक केले होते. तसेच ओडिशात मदत व पुनर्वसन कार्यासाठी एक हजार कोटीही त्यांनी जाहीर केले. पटनायक यांना खुश ठेवण्यासाठीच हे केल्याचे समजते.

रेड्डी, रावनाही सोबत घ्या

मतदान आटोपताच काँग्रेसने वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी, तेलंगणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चंद्राबाबूंचे म्हणणे आहे. टीआरएसचे प्रमुख राव बिगरभाजप व बिगरकाँग्रेस प्रादेशिक पक्षांची आघाडीच्या प्रयत्नात आहेत.
 

Web Title: Talks on the unity of anti-BJP parties, Chandrababu Naidu-Rahul Gandhi's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.