Take action on weight loss fraudulent advertisements - Vice President | वजन घटविण्याच्या फसव्या जाहिरातींवर कारवाई करा  - उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : झटपट वजन कमी करण्याच्या फसव्या आणि बनावट जाहिरातींचा गोरखधंदा बंद करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरकारला केले. अशाच एका जाहिरातीच्या नादी लागून आपण स्वत: १,२३० रुपयांना कसे फसविले गेलो, याचा अनुभवही त्यांनी कथन केला.
शुक्रवारी हा स्वानुभव राज्यसभेत कथन करताना नायडू म्हणाले की, उपराष्ट्रपती झाल्यानंतर लगेचच २८ दिवसांत वजन कमी करण्याची खात्री देणाºया एका औषधाची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. मी काही लोकांशी बोललो, पण अशा जाहिराती खºया नसल्याचे त्यांनी सांगितले. मी पुन्हा जाहिरात पाहिली. त्यात १,२३० रुपये भरावे लागतील, असे लिहिले होते. त्याप्रमाणे मी तेवढे पैसे भरले. पण त्यांनंतर मला ते औषध पाठविण्याऐवजी एक पाकीट आले. ‘अस्सल औषधासाठी आणखी एक हजार रुपये भरावे लागतील’, असे पत्र त्यात होते!
नायडू यांनी सांगितले की, यानंतर मी हे प्रकरण ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे उपस्थित केले. त्यांनी चौकशी केल्यावर संबंधित जाहिरात अमेरिकेतून दिली जात असल्ं़याचे आढळून आले.
अशा जाहिरातींचे मूळ अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशात असले तरी ही फसवणूक थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, असे ते म्हणाले.