डासना : बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची सुटका होणार असल्याने, डासना तुुरुंगाच्या बाहेर पत्रकारांनी शुक्रवारी एकच गर्दी केली होती. हे दाम्पत्य चार वर्षांपासून या कारागृहात आहे. मात्र, न्यायालयाचे आदेश न मिळाल्याने त्यांची सुटका झाली नाही. ती सोमवारी होईल, असे सांगण्यात आले.
सकाळपासूनच पत्रकार कॅमेरान, छायाचित्रकार यांनी तिथे गर्दी केली होती. हे दाम्पत्य केव्हा बाहेर येते आणि आपण त्याची छायाचित्रे केव्हा काढतो, त्यांची प्रतिक्रिया केव्हा घेतो, असे मीडियातील लोकांचे झाले होते. त्याखेरीज येणारे-जाणारे, तसेच हौसे गौशे यांनीही तिथे निष्कारण गर्दी केली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने या दाम्पत्याची गुरुवारी निर्दोष सुटका केली. मात्र, तसे कराताना सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांनी ज्या प्रकारे दाम्पत्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली, त्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरेही ओढले.
हे प्रकरण २००८ मधील आहे. अर्थात, आरुषीची हत्या मग केली कोणी? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. या हत्याकांडाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने दाम्पत्याच्या सुटकेविषयीही कमालीची उत्सुकता होती.
डासना तुरुंगाचे अधीक्षक डॉ. दधीराम मौर्य यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्हाला आतापर्यंत न्यायालयाचा आदेश मिळालेला नाही. या आदेशाची प्रत मिळताच त्यांना सोडण्यात येईल. राजेश तलवार यांच्यावर या आधी तुरुंगात जाताना हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आज तुरुंग परिसरात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. दंत चिकित्सक असलेले तलवार दाम्पत्य नोव्हेंंबर २०१३ पासून डासना तुरुंगात बंद आहेत. (वृत्तसंस्था)
‘त्या’ घरात आता राहात नाही दाम्पत्य-
नॉयडा : जलवायू विहार स्थित घर नं. एल-३२ मध्ये आता तलवार दाम्पत्य राहत नाही आणि यापुढेही राहणार नाही. तिथे अन्य कुटुंब राहते. याच घरात २००८ मध्ये आरुषी मृतावस्थेत आढळली होती. या घरात राहणारे कुटुुंब मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी शुक्रवारी काही पत्रकार दाखल झाले आणि त्यांनी घराची बेल वाजविली, पण दरवाजा उघडला गेला नाही. काही छायाचित्रकारांनी छतावर जाण्याचा प्रयत्न केला. याच छतावर हेमराजचा मृतदेह आढळला होता. मात्र, येथेही दरवाजाला कुलूप असल्याने कोणी जाऊ शकले नाही. जवळच्या अपार्टमेंटमध्ये राहणाºया काही जणांचे असे मत आहे की, हे एक ‘परफेक्ट मर्डर’ आहे. नुपूर यांचे पालक तेथून जवळच राहतात. कदाचित, काही दिवसांसाठी दाम्पत्य तिथे राहायला जातील, असा अंदाज आहे.