‘टिष्ट्वट’ मिळताच सुषमा स्वराज मदतीला!

By admin | Published: May 25, 2015 03:32 AM2015-05-25T03:32:44+5:302015-05-25T03:32:44+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सोशल मीडियावर अहोरात्र सजग असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना मदतीचा

Sushma Swaraj will get 'Thirty-seven'! | ‘टिष्ट्वट’ मिळताच सुषमा स्वराज मदतीला!

‘टिष्ट्वट’ मिळताच सुषमा स्वराज मदतीला!

Next

मुंबई : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सोशल मीडियावर अहोरात्र सजग असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना मदतीचा हात किती तत्परतेने मिळू शकतो याची हृदयद्रावक प्रचिती तेहरानमध्ये अडकलेल्या नाशिकच्या एका शोकाकुल कुटुंबास रविवारी आली. या कुटुंबाची अडचण सुषमा स्वराज यांना समजल्यावर अवघ्या दोन तासांत तेहरानमधील भारतीय वकिलातील अधिकारी मदतीला धावून आला.
मध्यपूर्व आशियातील देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि परदेस्थ भारतीयांच्या बाबींचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांची जाहीरपणे पाठ थोपटली होती. ते भारत सरकारने हाती घेतलेले संघटित व पूर्वनियोजित मिशन होते. पण तीच तत्परता व्यक्तिगत पातळीवरील अडचण सोडविण्यासाठीही दाखवून परराष्ट्र मंत्रालयाने संवेदनशील कारभाराचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
नाशिक येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक कृष्णा आडगावकर पत्नी रुपाली ( वय ३८ वर्षे), मुलगा गोविंद, मुली श्रद्धा व पूजा आणि आई, मामा-मामी यांच्यासह ‘एसओटीसी’ टूर्समार्फत २२ दिवसांच्या युरोप सहलीसाठी गेले होते. सहल उरकून भारतात परत असताना या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जर्मनीतील म्युनिकहून मुंबईसाठी निघालेले त्यांचे विमान शनिवारी दुपारी सुमारे ४० हजार फूट उंचीवर असताना रुपाली आडगावकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. विमानाचा पुढील नियोजित थांबा दोहा येथे होता. परंतु ही आणिबाणी लक्षात घेऊन विमान तातडीने तेहरान विमानतळावर उतरविण्यात आले. तेथे रुपाली यांच्यावर उपचार केले गेले, पण दुर्दैवाने त्याचा उपयोग झाला नाही. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
अनोळखी देशात असा अनावस्था प्रसंग ओढवलेल्या आडगावकर कुटुंबास पुढे काय करावे हे सुचेना. त्यांनी कृष्णा यांचे एक मित्र व अहमदनगरमधील एक सराफ व्यावसायिक सागर कायगावकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना अडचण सांगितली. सागर यांनी नगरचेच एक उद्योजक मित्र अश्विन गांधी यांना ही हकीकत सांगितली. गांधी यांनी पंतप्रधान कार्यालय व परराष्ट्र मंत्रालयाला टिष्ट्वट करून ही माहिती दिली आणि मदतीची याचना केली. गांधी यांचे टिष्ट्वट मिळताच अवघ्या दीड तासांत सुषमा स्वराज यांनी तेहरान येथील भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्यास आडगावकर कुटुंबियांच्या मदतीसाठी तेथील विमानतळावर रवाना केले व टिष्ट्वट करून तसे गांधी यांना कळविले.
रुपाली मुळच्या अहमदनगरच्या होत्या. त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सोमवारी सकाळी ११ पर्यंत आडगावकर कुटुंबीय मृतदेह घेऊन नाशकात पोहोचू शकतील, असे त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Sushma Swaraj will get 'Thirty-seven'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.