Sushma Swaraj blocked me- Pratapsingh Bajwa's allegations | सुषमा स्वराज यांनी मला ट्वीटरवर ब्लॉक केलं; प्रतापसिंह बाजवा यांचा आरोप

ठळक मुद्दे बेपत्ता झालेल्या भारतीयांबाबत सुषमा स्वराज यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संसदेची दिशाभूल केली असा आरोप बाजवा यांनी केला आहे.इराकमधील मोसूलजवळ 39 भारतीय बेपत्ता झाले असून त्यात पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, जालंधर शहरांमधील लोकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला ट्वीटरवर ब्लॉक केल्याचा आरोप राज्यसभेतील कॉंग्रेसचे खासदार यांनी केला आहे. इराकमध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी मला ब्लॉक केले असे बाजवा म्हणाले आहेत.
"अशाप्रकारे तुम्ही परराष्ट्र मंत्रालय चालवणार आहात का ? संसद सदस्याने 39 बेपत्ता भारतीयांबद्दल विचारलेल्या प्रश्नांबाबत तुम्ही अशा प्रकारे व्यक्त झालात तर परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाचा सन्मान राहिल का ?" अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करत बाजवा यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री  सुषमा स्वराज यांना विचारलेल्या प्रश्नाच्या ट्वीटचे स्क्रीन शॉटसही दिले आहेत. "पंजाब आणि देशाच्या इतर भागातील लोक परदेशात विविध समस्यांना तोंड देत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संबंधित देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करावी असे मी खासदार या नात्याने ट्वीट केले होते मात्र जर त्या खासदारालाच ब्लॉक करत असतील तर मग बाकीच्यांचे काय होईल ?" असा प्रश्न बाजवा यांनी विचारला आहे.

गुरुदासपूरचे माजी खासदार आणि कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या बाजवा यांना आपल्याला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केल्याचे लक्षात आले. पाकिस्तानातील खैबर-पख्तुनवा प्रांतात शिख समुदायातील लोकांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याबद्दल ट्वीट करुन बाजवा यांनी सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यामध्ये टॅग केले. बेपत्ता झालेल्या भारतीयांबाबत सुषमा स्वराज यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संसदेची दिशाभूल केली असा आरोप बाजवा यांनी केला आहे. इराकमधील मोसूलजवळ 39 भारतीय बेपत्ता झाले असून त्यात पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, जालंधर शहरांमधील लोकांचा समावेश आहे.