2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 07:26 AM2019-05-05T07:26:55+5:302019-05-05T07:30:37+5:30

लष्कराच्या राजकीय वापराबद्दल निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्याकडून नाराजी व्यक्त

surgical strikes Had Happened in the Past Too says Lt Gen DS Hooda | 2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया

2016च्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो म्हणतात, आधीही झाल्या 'अशा' धाडसी कारवाया

googlenewsNext

जयपूर: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाकडूनसर्जिकल स्ट्राइकवरुन दावे प्रतिदावे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी भाष्य केलं आहे. लष्करानं आधीही सीमा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केल्याचं हुडा यांनी म्हटलं. यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला हुडा यांनी उत्तर दिलं. 

'भारतीय लष्करानं याआधीही सीमा ओलांडून कारवाया केल्या आहेत. मात्र त्या नेमक्या कुठे आणि कधी केल्या याची मला कल्पना नाही,' असं हुडा यांनी जयपूरमध्ये पत्रकारांना सांगितलं. लष्कराच्या कामाचं राजकारण करणं अयोग्य असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले. 'निवडणुकीच्या प्रचारात लष्कराला आणणं योग्य नाही. निवडणूक आयोगानंदेखील तशा सूचना दिलेल्या आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणूक प्रचारात लष्कराच्या कामगिरीचा वापर होणं दुर्दैवी आहे. दीर्घकालीन परिस्थितीचा विचार केल्यास याचे लष्करावर प्रतिकूल परिणाम होतात,' असं हुडा यांनी म्हटलं. भारतीय लष्करानं उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये हुडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणांमध्ये अनेकदा राष्ट्रीय सुरक्षा आणि सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करत आहेत. मोदींच्या या भाषणांवर काँग्रेसकडून टीका होत आहे. गेल्याच आठवड्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य करताना मोदींवर शरसंधान साधलं. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक झाले. मात्र लष्करानं केलेल्या कारवायांचा आम्ही कधीही मतांसाठी वापर केला नाही, असं सिंग म्हणाले. यानंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन यूपीए सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाल्याचा दावा केला. काँग्रेसनं ठिकाणं आणि तारखांसह सर्जिकल स्ट्राइक्सची माहिती पत्रकारांना दिली. यावरुन केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसवर निशाणा साधला. यूपीए सरकारनं केलेले सर्जिकल स्ट्राइक अदृश्य होते, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. 
 

Web Title: surgical strikes Had Happened in the Past Too says Lt Gen DS Hooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.