मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षातील नाराज नेत्यांचे पक्षांतरही जोरदार सुरू असताना अनेक ठिकाणी सिने कलाकारांना अनेक पक्ष उमेदवारी देत आहेत. महाराष्ट्रात देखील उर्मिला मांतोडकर या अभिनेत्रीला उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, निवडणुकीत निवडून येणारे कलाकार राजकारणात रमतात की, आपल्या क्षेत्रात परतात हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे. यामध्ये असलेले कालाकार :

अमिताभ बच्चन 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी हेमवती नंदन बहुगुना यांच्याविरुद्ध १ लाख ८७ हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु, त्यांनी अर्ध्यातच राजकारण सोडून पुन्हा चित्रपट सृष्टीचा मार्ग धरला होता.

सुनील दत्त 

सुनील दत्त यांनी काँग्रेसकडून १९८४ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून राम जेठमलानी यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता. सुनील दत्त अखेरपर्यंत राजकारणात सक्रिय राहिले. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील उपभोगले होते.

राजेश खन्ना

राजेश खन्ना यांच्यासारखा स्टारडम त्यावेळी हिंदी सिनेमात कोणत्याच स्टारला नव्हतं. काँग्रेसच्या तिकीटावर राजेश खन्ना १९९२ आणि १९९६ मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. परंतु त्यांची राजकीय इनिंग अधिककाळ चालली नाही. त्यांनी लवकरच राजकारणाला अलविदा केले होते.

धर्मेंद्र

अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती. परंतु, राजकारणात त्यांची जादू चालली नाही. २००४ मध्ये बिकानेरमधून धर्मेंद्र निवडून आले होते. मात्र संसदेतील गैरहजरीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण सोडले होते.

गोविंदा

गोविंदाने आपल्या चित्रपटातून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याने २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. परंतु त्याची राजकीय कारकिर्द वादग्रस्त ठरली. अखेर गोविंदाने २००८ मध्ये राजकारण सोडून पुन्हा चित्रपटसृष्टीचा मार्ग धरला.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तला २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळाले होते. परंतु, न्यायालयाने संजय दत्तवर निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर संजय दत्तने २०१० मध्ये समावादी पक्ष सोडला होता. अखेरीस राजकारणात त्याची कारकिर्द सुरू होण्यापूर्वीच संपली होती.

परेश रावल

अभिनेते परेश रावल यांनी २००९ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. परंतु, परेश रावल यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. कार्यकर्ता म्हणून आपण भाजपचे काम करू, असंही त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले.

या व्यतिरिक्त राजकारणात अनेक अभिनेते-अभिनेत्री यशस्वी झाले आहेत. यामध्ये स्मृती इराणी, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, किरण खैर, हेमा मालिनी यांनी राजकारणात आपले एक स्थान निर्माण केले.


Web Title: Superstars in Ril Life; 'Flop' in politics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.