Sunjwa terrorist attack mastermind Mufti Waqas killed | सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार

नवी दिल्ली - काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुफ्ती वकास याला ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश मिळालं. लष्कराच्या 50 RR (राष्ट्रीय रायफल्स), सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करत मुफ्ती वकास याला ठार केलं. लेथपोरा गावातील हातीवारा परिसरात पार पडलेल्या चकमकीत ही कारवाई करण्यात आली.


'सुंजवा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती वकास याला सर्जिकल ऑपरेशनदरम्यान ठार करण्यात आलं आहे', अशी माहिती श्रीगनरमधील संरक्षण प्रवक्ता कर्नल राजेश कालिया यांनी दिली आहे. 'शस्त्र आणि स्फोटकं तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री जप्त करण्यात आली आहे. तो विदेशी दहशतवादी होता', असं काश्मीरचे आयजी एसपी पानी यांनी सांगितलं आहे. चकमकीदरम्यान एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

10 फेब्रुवारीला सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदच्या वकासचा हात होता. या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते, तर एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला होता. लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले होते. वकासचा मृत्यू दहशतवादी संघटनेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. 

 


Web Title: Sunjwa terrorist attack mastermind Mufti Waqas killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.