कणखर राजकीय झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:00 AM2017-11-19T04:00:12+5:302017-11-19T07:15:29+5:30

एके दिवशी इंदिरा गांधी यांना अटक करून तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. सुटका होताच त्या वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात गेल्या. पुन्हा संघर्षाला तयार झाल्या. या संघर्षातून सहा महिन्यांत चित्र बदलून टाकले. त्या पुन्हा सत्तेत आल्या.

Strong political thunderstorms | कणखर राजकीय झंझावात

कणखर राजकीय झंझावात

Next

- शरद पवार
(माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष)

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा गांधींना पक्षातून काढण्याचा निर्णय झाला. ब्रह्मानंद रेड्डी यांनी हा निर्णय घेतला. मोरारजीभार्इंचे सरकार सत्तेवर होते. संजय गांधी व इंदिरा गांधी यांची शहा आयोगाद्वारे चौकशी सुरू झाली. एके दिवशी इंदिरा गांधी यांना अटक करून तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. सुटका होताच त्या वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात गेल्या. पुन्हा संघर्षाला तयार झाल्या. या संघर्षातून सहा महिन्यांत चित्र बदलून टाकले. त्या पुन्हा सत्तेत आल्या.

इंदिरा गांधी हे प्रभावशाली, जनतेचा प्रचंड पाठिंबा, गरिबांविषयी आस्था असणारे व्यक्तिमत्त्व होते. मी मुख्यमंत्री असतानाची गोष्ट. रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीबरोबर धान्य द्यायचा असा निर्णय मी घेतला होता. त्याचा परिणाम पाहण्यासाठी मी गोंदिया-भंडारा भागात दौरा काढला. खूप लोक दुष्काळी कामांवर होते. मी ठरविले की लोकांना प्रत्यक्ष भेटायचे. अधिकाºयांना टाळून व त्या भागाची माहिती असलेला ड्रायव्हर आणि जीप घेऊन मी कामाच्या ठिकाणी गेलो. तेथील मजुरांना मी मजुरी मिळते का? गहू मिळतो का? हे कोणी सुरू केले? असं विचारलं. त्यावर त्यांनी उत्तर दिले, हे बार्इंनी सुरू केले. कोण बाई? असे विचारताच, इंदिराबाई, हे उत्तर आले. यात इंदिराबार्इंचा काय संबंध? असे विचारता, तिनेच आम्हाला धान्य द्यायला सुरू केले. गरिबीशी समरस झालेले व्यक्तिमत्त्व हे इंदिरा गांधींचे वैशिष्ट्य माझ्या मनात ठसले आहे.
आणीबाणीपूर्व काळात कॉँग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली. निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, ब्रह्मानंद रेड्डी, के. कामराज यांच्यासारखे ज्येष्ठ नेते वेगळ्या दिशेने जायला लागले होते. बाबू जगजीवनराम, फक्रुद्दीन अली अहमद आदी नेते इंदिराजींसोबत होते. मी तेव्हा राज्यात मंत्री होतो. कॉँग्रेस समितीचे अधिवेशन बंगळुरूत होते. तिथे संसदीय पक्षाच्या बैठकीत सिंडिकेटतर्फे नीलम संजीव रेड्डी यांचे तर इंडिकेटतर्फे जगजीवनराम यांचे नाव आले. रेड्डी यांच्या बाजूने कामराज, निजलिंगप्पांपासून सर्व दिग्गजांनी मत दिले. यशवंतरावांनी जगजीवनराम हे नाव येताच यशवंतरावांनी रेड्डी यांच्या बाजूने हात वर केला. इंदिरा गांधी रागावल्या. जगजीवनरामना मान्यता देऊन नंतर मत फिरविल्याने चव्हाण साहेबांना त्यांनी मंत्रिमंडळातून वगळण्याचे ठरविले. त्यावर इंदिराजींचे स्वीय सहायक डी. पी. धर म्हणाले, की त्यांना वगळू नका. चव्हाण साहेब मासबेस असलेले नेते आहेत. त्यांच्याऐवजी मोरारजीभार्इंना वगळा. त्यांनी तेच केले. तेथेच कॉँग्रेसमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली.
नंतर इंदिराजींनी बॅँकांचे राष्टÑीयीकरण केले, संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा निर्णय घेतला. गरिबांच्या बाजूने भूमिका घेतल्यावर चव्हाण साहेबांनी पाठिंबा दिला. पण कॉँग्रेस दुभंगलेली होती. चव्हाण साहेब व इंदिराजी यांच्यात अंतर पडत गेले. इंदिराजींना चव्हाण साहेबांचा पाठिंबा असला तरी संजीव रेड्डी यांची उमेदवारी पक्षाकडून आली होती. ते अधिकृत उमेदवार होते. इंदिराजींनी रेड्डी यांच्या अर्जावर सही केली होती. मात्र, त्यांचे आशीर्वाद व्ही. व्ही. गिरी यांना होते. गिरी यांना मदत करायला तरुण तुर्क चंद्रशेखर, कृष्णकांत, मोहन धारिया यांनी प्रचार केला. पक्षाचे उमेदवार रेड्डी असल्याने आम्ही रेड्डींना मतदान केले. गिरी यांना यशवंतराव मोहिते, तुळशीदास जाधव व आनंदराव चव्हाण अशी तीन-चार मते मिळाली. तरीही रेड्डी यांचा पराभव झाला. गिरी राष्टÑपती झाले. इंदिरा गांधी यांनी रेड्डी यांच्या अर्जावर सही केली; पण निवडून गिरी यांना आणले. याचे कारण बंगळुरू अधिवेशनात सगळ्यांनी मिळून गॅँगअप करून पंतप्रधानांना संकटात टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी उत्तर दिले. ‘गुंगी गुडिया’ म्हणणाºयांना धडा शिकविला.
त्यानंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ या घोषणेमुळे त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला. मग अत्यंत आक्रमक वृत्तीने त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्याला विरोध होऊ लागला. तुम्ही देशात आणीबाणी लागू करण्याची भूमिका घ्या, असा सल्ला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर राय यांनी दिला. आणीबाणी लागू झाली. विठ्ठलराव गाडगीळ, मी असे काही जण अस्वस्थ होतो. सेन्सॉरशिप आली. काही वर्तमानपत्रांत अग्रलेख कोरा सोडला जाऊ लागला. मते व्यक्त करण्यावरील बंधनांमुळे नाखुशी होती. पुन्हा पक्षाची बैठक झाली. देशाची स्थिती योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हे तात्पुरते कडू औषध आहे, ही भूमिका मांडली गेली. विनोबा भावे यांनीही अनुशासन पर्व असा शब्द वापरला. हे ठरावीक काळासाठी आहे, काळाबाजारासारख्या गोष्टींना आळा घालण्यासाठी हे करण्याची गरज आहे, असे सांगण्यात आले.
आणीबाणीनंतरच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा गांधींना पक्षातून काढण्याचा निर्णय झाला. ब्रह्मानंद रेड्डी यांनी हा निर्णय घेतला. मोरारजीभार्इंचे सरकार सत्तेवर होते. संजय गांधी व इंदिरा गांधी यांची शहा आयोगाद्वारे चौकशी सुरू झाली. एके दिवशी इंदिरा गांधी यांना अटक करून, तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. सुटका होताच त्या वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात गेल्या. पुन्हा संघर्षाला तयार झाल्या. या संघर्षातून सहा महिन्यांत चित्र बदलून टाकले. तेव्हाच जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने मोरारजीभार्इंचे सरकार गेले. चव्हाण साहेब पंतप्रधान होतील, असे दिसू लागले. परंतु, त्यांना साथ मिळाली नाही. चरणसिंह पंतप्रधान झाले. त्यांचा पाठिंबाही इंदिराजींनी काढला. पुन्हा निवडणूक झाली आणि त्या सत्तेत आल्या. चव्हाण साहेबही काँग्रेसमध्ये गेले. इंदिराजींनी त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष केले खरे. पण त्यांच्यातील दुरावा तसात राहिला.
नंतरच्या काळात देशात आणि देशाबाहेर माध्यमांनीही त्यांच्या विरोधात सतत भूमिका घेतली. पण त्या धाडसाने उभ्या राहिल्या. नंतरच्या काळात पंजाबचा प्रश्न आला. तेव्हा जी पावले टाकली होती, त्याची किंमत द्यावी लागली. इंदिराजींची हत्या झाली. एका मोठ्या पर्वाची ती अखेरच म्हणायला हवी.

(शब्दांकन : विजय बाविस्कर)

 

Web Title: Strong political thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.