ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 20 - महात्मा गांधींचे चित्र असलेल्या चार दुर्मीळ स्टॅम्पना युनायटेड किंग्डममधील लिलावात विक्रमी किंमत मिळाली आहे. गांधींचे चित्र असलेले हे स्टॅम्प 5 लाख पौंड (चार कोटी रुपये) एवढ्या विक्रमी किमतीला विकले गेले आहेत. भारतीय स्टॅंम्पला मिळालेली आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम असल्याचे लिलावकर्त्यांनी सांगितले आहे. 
गांधींचे छायाचित्र असलेले पर्पल ब्राऊन आणि लेक सर्वीस वाले  केवळ 13 स्टॅम्प 1948 साली जारी करण्यात आले होते. या स्टॅम्पची किंमत तेव्हा दहा रुपये एवढी होती. दरम्यान, या दुर्मीळ स्टॅम्पपैकी 4 स्टॅम्प लिलावामध्ये एका खाजगी ऑस्ट्रेलियन संग्राहकाने सर्वाधिक किंमत देऊन खरेदी केले. कुठल्याही भारतीय टपाल तिकिटाला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे, ही चार तिकिटे दुर्मीळ आहेत कारण ही चारही तिकिटे एकाच सेटमध्ये आहेत,  असे ब्रिटनमधील विक्रेता स्टेनली गिब्सन याने सांगितले.
या वर्षा मार्च महिन्यात झालेल्या एका लिलावात चार आण्याचे एक तिकीट 91 लाख  सहा हजार 434 रुपयांना विकले गेले होते. त्यानंतर गांधीजींचे चित्र असलेली ही टपाल तिकिटे भारतीय टपाल तिकिटांमधील एक दुर्मीळ संग्रह आहे. मात्र या लिलावामध्ये टपाल तिकिटाला मिळालेली सर्वाधिक किंमत 9 कोटी 50 लाख एवढी होती.  
दर्जेदार भारतीय दुर्मीळ वस्तूंचा बाजार गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्यापैकी भक्कम झाला आहे. श्रीमंत भारतीयांच्या आशा आकांक्षा आणि ऐतिहासिक संपत्तीला आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून असलेल्या मागणीमुळे त्याला दुजोरा मिळत आहे. असे कीथ हेडल यांनी सांगितले आहे.