प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा; लष्कराच्या सामर्थ्याचे, कला-संस्कृतीचे घडले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 03:18 AM2018-01-27T03:18:24+5:302018-01-27T03:19:45+5:30

आज राजपथवर दहा देशातील राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या नेत्रदीपक सोहळ्यातील संचलनात भारताचे जगात अव्वल स्थान असल्याचे दर्शन घडले.

The spectacular celebration of Republic Day; The power of the army, the culture of art and culture | प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा; लष्कराच्या सामर्थ्याचे, कला-संस्कृतीचे घडले दर्शन

प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा; लष्कराच्या सामर्थ्याचे, कला-संस्कृतीचे घडले दर्शन

Next

विकास झाडे
नवी दिल्ली : आज राजपथवर दहा देशातील राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या नेत्रदीपक सोहळ्यातील संचलनात भारताचे जगात अव्वल स्थान असल्याचे दर्शन घडले. असोसिएशन आॅफ साऊथ ईस्ट नेशन्स (आसियान) या आग्नेय आशियातील दहा देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीमुळे आजच्या सोहळ्याला विशेष महत्त्व होते. भारतीय संस्कृती-विविधता याशिवाय देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन राजपथावर घडले.

आज सकाळी तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी इंडिया गेटवर अमर ज्योती येथे सकाळी ९.३० वाजता शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण करत तिरंग्याला सलामी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. तिरंग्याला सलामी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

तब्बल ४४ वर्षांनंतर तब्बल १० विदेशी पाहुण्यांना राजपथावरील संचलन कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले. दोन तासांच्या संचलनात प्रथमच सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांच्या पथकांनी मोटारसायकलवरील चित्तथरारक कवायती केल्या. यावर्षी संचलनात पाच तुकड्यांचे नेतृत्व महिलांनी केले. यामुळे देशातील स्त्रीशक्तीची झलक देशाला पाहायला मिळाली. सैन्याच्या जवानांनी आसियान देशांचे ध्वज फडकविले. आजच्या संचलनात कम्बोडिया, मलेशिया, थायलंडमधील लोकनृत्यदेखील सादर करण्यात आले. नौदलातील स्वदेशी बनावटीची ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती संचलनात सादर करण्यात आली. कृषी अनुसंधान परिषद, आॅल इंडिया रेडिओ, आयकर विभाग अशा विविध विभागांच्या चित्ररथांचा सहभाग होता.

याशिवाय देशाच्या विविधतेचे दर्शन घडविणारे विविध राज्यांचे २३ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याच दर्शन जगाला घडले. यंदाच्या संचलनात सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. ‘ब्राह्मोस’' हे भारताच्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. यासोबतच इतरही क्षेपणास्त्र व शस्त्रास्त्रांचा संचलनात समावेश करण्यात आला होता. स्वदेशी जातीचे शस्त्रास्त्र शोधक रडार ‘स्वाती’चे मेजर सागर कुलकर्णी यांनी या पथकाचे नेतृत्व केलं. ‘सदा तयार’ असं या पथकाचे घोषवाक्य होते. आपत्कालीन परिस्थितीत सैनिकांना हालचाल करण्यासाठी पूल बनविण्याची जबाबदारी असलेल्या टी-२० रणगाडा पथकाचं नेतृत्व मेजर एस. चंद्रशेखरन यांनी केले. आकाश संरक्षण यंत्रणा हाताळणा-या पथकाचे नेतृत्व कॅप्टन शिखा यादव यांनी केले.

नांदेडचा अब्दुल रौफ शूर बालक!
असामान्य शौर्य दाखविणा-या देशभरातील राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त १८ मुलामुलींनी यावेळी उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन केले. नांदेड जिल्ह्यातील नदाफ इजाज अब्दुल रौफ याचा या शूर बालकांमध्ये समावेश होता.

राजपथावर २३ चित्ररथांचे सादरीकरण!
राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या सात खात्यांचे आणि भारत-आसियान राष्ट्रांचे संबंध दाखविणारे दोन चित्ररथ अशा एकूण २३ चित्ररथांचे सादरीकरण झाले. विविध राज्यांच्या बहुरंगी चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारताची संस्कृतीच राजपथावर अवतरली होती.
मध्य प्रदेशच्या चित्ररथावरील भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या चार शिष्यांची ध्यानस्थ मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. उत्तराखंडने आपल्या चित्ररथातून स्थानिक लोकजीवनाचे व लोकसंगीताचे दर्शन घडवले. आदिवासीबहुल राज्य म्हणून ओळखल्या जाणा-या छत्तीसगडचा चित्ररथही पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व सांगणारा होता. लक्षद्वीपचा चित्ररथ या छोट्याशा बेटावरील लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा होता. केरळ राज्य मंदिराचं राज्य म्हणूनही ओळखले जाते यंदाच्या चित्ररथातून केरळनं तेथील याच मंदिर संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. पंजाबच्या चित्ररथातून यंदा श्रद्धा आणि सेवेचा संगम पाहायला मिळाला. गुरुद्वारांमध्ये नित्यनेमानं चालणाºया लंगरची झलक या माध्यमातून सर्वांना दिसली. गुजरातच्या चित्ररथावर यंदा महात्मा गांधी यांचा साबरमती आश्रमाचा देखावा उभारण्यात आला होता.

क्षणचित्रे :
- ९.५५ वा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राजपथावर आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्वागत
- १० वा. ध्वजारोहण आणि मानवंदना देण्यात आली.
- १०.०५ वा. राजपथावरील परेडला सुरुवात झाली.
- १० आसियान देशांच्या राष्ट्रध्वजांसह राजपुताना रायफल्सच्या तुकडीतील जवानांनी मार्च केले.
- ८८१ मिसाईल रेजिमेंटच्या ब्राह्मोस आॅटोनॉमस यंत्रणेचं पथक. कॅप्टन मेघराज यादव यांनी या पथकाचं नेतृत्व केले.
- ११.३७ वा. कार्यक्रमाचा समारोप, राष्ट्रपतींच्या सुरक्षा रक्षकांचे पथक राजपथावर


काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले भारतीय हवाईदलाचे गरुड कमांडो जे. पी. निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान देण्यात आला, हा सन्मान प्रदान करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भावना अनावर झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. निराला यांची आई व पत्नीने अशोक चक्र सन्मान स्वीकारला. यावेळी निराला यांनी काश्मीरमध्ये गाजवलेल्या शौर्याचे वर्णन ऐकून राष्ट्रपती भावुक झाले. अशोक चक्र प्रदान केल्यानंतर राष्ट्रपतींनी रुमाल काढून आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले.

महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी महाराष्ट्राचा चित्ररथ साकारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर उभारण्यात आला होता. राज्यभिषेक सोहळ्याचा हा चित्ररथ कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या ‘तेज तम अंस पर। कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर। सेर सिवराज है।’ या काव्याच्या सुरांमध्ये राजपथावर दाखल झाला. महाराष्ट्राच्या चित्ररथावर शिवाजी राजांची अश्वारूढ प्रतिकृती होती तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती उभारून तेथेच मेघडंबरीमध्ये सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले दाखविण्यात आले होते. महाराजांच्या आजूबाजूला आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट आणि राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री आॅक्सिजनही दाखविण्यात आला होता. राजमाता जिजाऊ, पत्नी सोयराबाई आणि छोटे संभाजीराजेही दाखविण्यात आले होते.

संभाजीराजेंकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष !
महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर येताच खासदार संभाजी राजे यांनी कुटुंबासहित जागेवर उभं राहत ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उद्घोष केला. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर मंत्री व नेतेही उभे झाले. त्यात अमित शहा, स्मृती इराणी आदींचा समावेश होता. 

Web Title: The spectacular celebration of Republic Day; The power of the army, the culture of art and culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.