SP-BSP alliance rise tension for BJP | बुआ-बबुआची आघाडी करणार भाजपाच्या गणिताची बिघाडी!
बुआ-बबुआची आघाडी करणार भाजपाच्या गणिताची बिघाडी!

ठळक मुद्देसमाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यातील निवडणूकपूर्व आघाडी आज प्रत्यक्षात आलीबुआ-बबुआच्या या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे राजकीय गणित बिघडले आहे.आता भाजपाकडून कोणती रणनीती अवलंबण्यात येते यावर या पक्षाचे उत्तर प्रदेशातील भवितव्य अवलंबून असेल

- बाळकृष्ण परब 

अनेक दिवसांपासून बातम्यांचा विषय ठरलेली आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय विश्लेषकांच्या चर्चेत असलेली उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यातील निवडणूकपूर्व आघाडी आज प्रत्यक्षात आली आहे. बसपाच्या सुप्रिमो असलेल्या मायावती (बुआ) आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव (बबुआ) यांनी लखनौ येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत या आघाडीची घोषणा केली. या घोषणेमुळे दिल्लीचे तख्त जिंकण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणाला मूर्त स्वरूप मिळाले आहे. तसेच गत लोकसभा निवडणुकीत सनसनाटी विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे राजकीय गणित बिघडले आहे. मात्र बुआ-बबुआच्या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात खरोखरच भाजपाची दाणादाण उडेल का? या आघाडीतून बाहेरची वाट दाखवण्यात आलेल्या काँग्रेसचे आता या राज्यातील भवितव्य काय हे या घडीला निर्माण झालेले प्रश्न आहेत.

 दिल्लीच्या तख्ताकडे जाणारा राजमार्ग 80 खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशातून जातो, असे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. गेल्या 16 लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा आढावा घेतल्यास बहुतांशवेळा ते खरे ठरल्याचे दिसते. 1977 ची आणीबाणीनंतरची निवडणूक, 1989  मध्ये बोफोर्स प्रकरणानंतर झालेली लोकसभा निवडणूक तसेच 2014 ची मोदींच्या उदयानंतर झालेली लोकसभेची निवडणूक या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरली होती. त्यामुळे आता झालेली सपा आणि बसपाची आघाडीसुद्धा वरील निवडणुकांप्रमाणे नवा इतिहास रचणार का? याची उत्सुकता लागली आहे. 

2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला बहुमत मिळणार नाही, असे सर्व विरोधक आणि राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत असताना उत्तर प्रदेशचा मतदार एकमुखाने मोदींच्या आणि भाजपाच्या मागे उभा राहिला होता. त्याजोरावर भाजपाने लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सपा आणि काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडवत भाजपाने मोठे यश मिळवले होते. त्यामुळे आज घोषणा झालेली सपा आणि बसपाची आघाडी ही भाजपाच्या दृष्टीने उत्तर प्रदेशातील मोठे आव्हान ठरणार आहे. याआधी 1993 साली सपा आणि बसपाने आघाडी करून त्यावेळी राम मंदिराच्या लाटेवर स्वार असलेल्या भाजपाला पराभूत केले होते. मात्र गेस्ट हाऊस कांड प्रकरणानंतर दोन्ही पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मार्ग वेगळे झाले होते. दरम्यानच्या काळात गंगा-यमुनेतून भरपूर पाणी वाहून गेले आहे. आजच्या घडीला नरेंद्र मोदी नावाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकत्र येणे ही सपा आणि बसपाची आजची राजकीय अपरिहार्यता आहे. मात्र या अपरिहार्यतेतूनच मयावाती आणि अखिलेश यादव यांनी उभी केलेली आघाडी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासमोर मोठे आव्हान उभे करण्यात सध्यातरी यशस्वी ठरली आहे, असे चित्र आहे. 

2014 साली लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करायची असल्यास भाजपाला उत्तर प्रदेशात दणदणीत यश मिळवावे लागणार आहे. मात्र मायावती आणि अखिलेश यादव यांच्या हातमिळवणीमुळे भाजपाचे उत्तर प्रदेशातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला सपा आणि बसपा यांच्या आघाडीच्या मतांची गोळाबेरीज निदान कागदावर तरी भाजपापेक्षा अधिक आहे. 2014 च्या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघातील मतदान हा आधार मानून या पक्षांना मिळालेल्या मतांची मोजणी केल्यास 80 पैकी 42 मतदारसंघांमध्ये मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीला मताधिक्य मिळू शकते. तर भाजपाला केवळ 34 त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अपना दल पक्षाला दोन मतदारसंघात आघाडी मिळू शकते. त्यातही भाजपाने 2014 मध्ये मोठ्या मताधिक्याने जिंकलेल्या फूलपूर, गोरखपूर आणि कैराना या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाआघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे सपा बसपाच्या मतांच्या गोळाबेरजेला मात देता येतील असे केवळ 31 मतदारसंघ भाजपाकडे आहेत. तर अमेठी आणि रायबरेली या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहील.  

एकंदरीत परिस्थिती बघता भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सपा आणि बसपाच्या आघाडीची खिल्ली उडवत असले तरी प्रत्यक्षात उभ्या असलेल्या आव्हानाची जाणीव त्यांनाही असेलच. 2014 च्या तुलनेत भाजपाची मतांची टक्केवारी किंचितशी घटली आणि सपा-बसपाकडे मतदार वळला तरी भाजपाची दाणादाण अटळ आहे. मात्र मायावतींची मते त्यांच्या आघाडीतील सहकाऱ्याकडे वळतात, पण त्यांच्या सहकारी पक्षांची मते तितक्याश्या प्रमाणात बसपाकडे वळत नाहीत, असे चित्र अनेक निवडणुकांमध्ये  दिसले आहे. तसेच सपा आणि बसपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून असलेले वैर हे सुद्धा या आघाडीसाठी प्रत्यक्ष मतदानावेळी कळीचे ठरणार आहे. त्यात उमेदवारांची निवड झाल्यावर संभाव्य बंडखोरी टाळतानाही दोन्ही नेत्यांची कसोटी लागणार आहे. मात्र सध्यातही मायावती आणि अखिलेश यांची आघाडी  सशक्त भासत आहे. दुसरीकडे मायावती आणि अखिलेश यांच्या एकत्र येण्याची चाहूल लागल्यापासून भाजपाने आपला जनाधार वाढवण्यासाठी नियोजित कार्यक्रम हाती घेतला होता. सध्या  उत्तर प्रदेशमधील प्रत्येक बूथवर 51 टक्के मतदान व्हावे यासाठी भाजपाच्या नेत्यांकडून अभियान चालवण्यात येत आहे. तसेच मोदीलाट ओसरली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये भाजपाकडून कोणती रणनीती अवलंबण्यात येते यावर या पक्षाचे उत्तर प्रदेशातील भवितव्य अवलंबून असेल.  


Web Title: SP-BSP alliance rise tension for BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.