Sonia Gandhi borrow Rs 120 from her driver for outgoing Congress Rajya Sabha MP Rajani Patil | महाराष्ट्रातील 'या' खासदारासाठी सोनिया गांधींनी ड्रायव्हरकडून 120 रूपये घेतले उसने
महाराष्ट्रातील 'या' खासदारासाठी सोनिया गांधींनी ड्रायव्हरकडून 120 रूपये घेतले उसने

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील काँग्रेसच्या मावळत्या खासदार रजनी पाटील यांच्यासाठी मंगळवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. राज्यसभा खासदार असलेल्या रजनी पाटील यांना काँग्रेसकडून यावेळी पुन्हा संधी देण्यात आली नाही. मात्र, मंगळवारी रजनी पाटील यांना आलेल्या सुखद अनुभवामुळे त्यांच्या मनात कोणतीही खंत राहणार नाही, हे मात्र निश्चित.

रजनी पाटील या मंगळवारी राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी सोनिया गांधी तुम्हाला शोधत असल्याचा निरोप दिला. निरोप मिळाल्यावर रजनी पाटील घाईघाईने सेंट्रल हॉलच्या बाहेर पडल्या. पाटील यांनी बाहेर येऊन सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी सोनिया गांधी घरी जायला निघाल्या होत्या. राज्यसभेत नसल्यामुळे आता कदाचित रजनी पाटील यांची नेहमी भेट होणार नाही, या विचाराने सोनियांनी त्यांना आपल्या गाडीतून घरापर्यंत येण्याची विनंती केली. गाडीत बसल्यानंतर सोनिया गांधी आणि रजनी पाटील यांच्या संभाषणाला सुरुवात झाली. तुम्ही राज्यसभेत नसलात तरी पक्ष कायम तुमच्यासोबत असेल, असे सोनियांनी पाटील यांना सांगितले. त्यानंतर संपूर्ण रस्त्यात या दोघींच्या गप्पा अशाच सुरू होत्या. परंतु, गाडी सोनियांच्या 10 जनपथ या निवासस्थानी आल्यानंतर रजनी पाटील यांना गाडीतून उतरताना अचानक काहीतरी आठवले आणि त्यांना थोडासा धक्का बसला. 

सोनियांच्या निवासस्थानापासून रजनी पाटील यांना खासगी वाहनाने संसदेपर्यंत जावे लागणार होते. मात्र, सेंट्रल हॉलमधून घाईघाईत निघताना रजनी पाटील त्यांची पर्स आणि मोबाईल तेथेच विसरुन आल्या होत्या. त्यांची गाडीही संसदेच्या आवारात पार्क केली होती. त्यामुळे आता पैशांशिवाय संसदेपर्यंत कसे परत जायचे, असा प्रश्न रजनी पाटलांना पडला. त्यांनी ही गोष्ट सोनिया गांधींना सांगितली. मात्र, त्यावेळी सोनिया गांधी यांच्याजवळही पैसे नव्हते. तेव्हा सोनियांनी आपल्या ड्रायव्हरकडून 120 रुपये उसने घेऊन रजनी पाटील यांना दिले. हे पैसे घेऊन रजनी पाटील 24 अकबर रोडवर असलेल्या काँग्रेस मुख्यालयापर्यंच चालत गेल्या. तेथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रजनी पाटील यांना संसदेत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. दुसरीकडे काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांना पाटील यांची पर्स आणि मोबाईल मिळाला. त्यांनी तो आपल्याकडे ठेवून घेतला.

मात्र, रजनी पाटील यांची स्वारी संसदेत आल्यानंतर भलतीच खुश होती. त्या बराचवेळ संसदेत बसून होत्या आणि येणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला हा किस्सा सांगत होत्या. आपण सोनियाजींनी दिलेले 120 रुपये खर्च न करता आपल्याकडेच आठवण ठेवणार असल्याचे रजनी पाटील यांनी सांगितले. 


Web Title: Sonia Gandhi borrow Rs 120 from her driver for outgoing Congress Rajya Sabha MP Rajani Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.