ऑनलाइन लोकमत
बिहार, दि. 19 - बिहारमध्ये एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडितेवर 6 अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला असून, त्यातील दोन मुलं तिच्या परिचयाची आहेत. 16 जूनला घडलेली ही घटना आज उघड झाली आहे. अल्पवयीन आरोपींपैकी एक जण पीडितेच्या शाळेतच असल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

पीडित मुलगी शाळेसाठी घरातून बाहेर जात असताना हा नराधम अल्पवयीन मुलांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिला मारहाण करत तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर मुलीच्या घराशेजारीलच शेतात त्या अल्पवयीन मुलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर जखमी अवस्थेतच पीडितेला मुलांनी किऊल रेल्वे स्टेशनच्या रुळावर फेकून दिले. रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पीडितेला पाहून आजूबाजूच्या लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारासाठी तिला रुग्णालयानं तात्काळ बेड उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे जवळपास 14 तास ती उपचाराविनाच राहिली. बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पैसे मागितल्याचा आरोपही पीडितेच्या भावानं केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त झळकताच सरकारनं तिला मदत दिली. दरम्यान, पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून इतर मुलांचा शोध सुरू आहे.