ठळक मुद्देनोटाबंदीचा निर्णय किती योग्य होता, त्यातून काय फायदे झाले हे सांगण्याचा प्रयत्न मोदींनी या व्हिडिओमधून  केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एकवर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात हा निर्णय फायद्याचा कि, तोटयाचा ठरला यावर मंथन सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी त्यांच्या टि्वटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 

नोटाबंदीचा निर्णय किती योग्य होता. त्यातून काय फायदे झाले हे सांगण्याचा प्रयत्न मोदींनी या व्हिडिओमधून  केला आहे. सात मिनिट तेरा सेकंदाचा हा व्हिडिओ एक प्रकारे छोटासा माहितीपटच आहे. विरोधक मात्र आज काळा दिवस साजरा करत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. लोकांच्या नोक-या गेल्या, रोजगार घटले, छोटया व्यापा-यांपासून ते सर्वसामान्यांना या निर्णयाची मोठी झळ सहन करावी लागली असा विरोधकांचा आरोप आहे.  

मोदी सरकारमधील मंत्री आज देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन नोटाबंदीच्या निर्णयाचे फायदे सांगत आहेत तर, विरोधक हा निर्णय कसा चुकला, देशाचे किती नुकसान झाले हे सांगत आहेत. 

दिल्लीत रिझर्व्ह बँकेबाहेर काँग्रेसचं आंदोलन
नोटाबंदीच्या या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना मंगळवारी रात्रीपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाबाहेर रात्री उशीरा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तर दुसरीकडे बुधवारी सकाळी छत्तीसगडमध्ये नोटाबंदीविरोधात काँग्रेसतर्फे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं.