नवी दिल्ली - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा अनेकदा आपल्याच पक्षाला टार्गेट करताना पाहायला मिळतात. मंगळवारीही शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान, भाजपा पक्षामध्ये निरनिराळ्या विचारांची लोकं आहेत, असे विधान केले होते. पंतप्रधान मोदींच्या याच विधानाचा संदर्भ देत शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत की, 'मी विन्रमपणे विचारु इच्छितो की कधी कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की पक्षामध्ये अशी स्थिती का आहे?. काही नेते निराळ्या विचारांचे का आहेत?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे काही नेते निराळ्या विचारांचे का आहेत? हे जाणण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे', असा थेट सवाल सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींवर हे टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नाही तर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी यांना आत्मनिरीक्षण करण्याचाही सल्ला दिला आहे. याबाबत बोलताना सिन्हा यांनी ट्विटमध्ये असे म्हटलंय की, 'आत्मनिरीक्षणाची गरज आहे. जी लोकं सत्तेत आहेत त्यांच्याकडून त्या 'काही लोकां'साठी आतापर्यंत कोणत्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले, की केवळ वापर करुन त्यांना सोडून देण्यात आलं.' अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी यापूर्वीही अनेक मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली आहे. याआधी त्यांनी तमिळ सिनेमा मर्सलचंही समर्थन केले होते. या सिनेमाला भाजपा नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवला होता. या सिनेमामध्ये नोटाबंदी आणि जीएसटी सारखे विषय  अयोग्यरित्या मांडण्यात आलेले आहेत,असे सांगत भाजपा नेत्यांनी सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवत ती काढण्याची मागणी केली होती.