शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 11:49 AM2018-12-12T11:49:08+5:302018-12-12T12:24:14+5:30

राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.  

Sharad Pawar shows big mistake of Narendra Modi in 5 state Assembly Election | शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

शरद पवारांनी सांगितलं मोदींचं नेमकं काय चुकलं!

googlenewsNext
ठळक मुद्देसाडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत?आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय आहे.काँग्रेसचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलंय, आता सपा-बसपानंही त्यांना साथ द्यावी.

मुंबईः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला सत्ता का गमवावी लागली, याचं चिंतन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा करतील तेव्हा करतील; परंतु राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे.  

जनता कुणाचीही मग्रुरी सहन करत नाही, निकालानंतर शरद पवारांचा मोदींना टोला

'एका कुटुंबाने काही केलं नाही, असं म्हणत नरेंद्र मोदी सातत्याने गांधी कुटुंबावर टीका करत राहिले. परंतु, आजच्या तरुण मतदारांनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा अगदी राजीव गांधींनाही पाहिलेलं नाही. त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाहिलंय. हे दोघंही सत्तेच्या खुर्चीवर नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करणं जनतेला रुचलं नाही. उलट, साडेचार वर्षांपूर्वी विकासाबद्दल बोलणारे आता फक्त गांधी कुटुंबावर हल्ला का करताहेत, याबद्दल त्यांना आश्चर्यच वाटलं आणि ही टीकाच भाजपाला भोवली', असं मत शरद पवार यांनी मांडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेल्या भाषेवरही त्यांनी टिप्पणी केली. आता तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने देणं अशोभनीय असल्याची चपराक त्यांनी लगावली. 


शेतकरी, आदिवासी आणि ग्रामीण भागासोबतच शहरी भागांतही मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. याचाच अर्थ जो वर्ग विकासाच्या मुद्द्यावर भाजपासोबत गेला होता, तोही मोदी सरकारवर नाराज आहे, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. सीबीआय, रिझर्व्ह बँक यासारख्या स्वायत्त संस्थांवर केलेला हल्ला, निवडणुकीतील पैशाचा वापर हे मुद्देही निर्णायक ठरल्याचं पवार म्हणाले. 

काँग्रेसला साथ द्या!

पाच राज्यांमधील निवडणूक निकाल पाहता काँग्रेसचं नेतृत्व जनतेनं स्वीकारल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनेही विरोधी आघाडीत सहभागी व्हावं, काँग्रेसला साथ द्यावी, असं आवाहन पवारांनी केलं. 

दरम्यान, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बहुमतापासून अवघ्या दोन जागा दूर असलेल्या काँग्रेसला बहुजन समाज पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. आता काँग्रेस कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालणार, याबद्दल उत्सुकता आहे. 



 

Web Title: Sharad Pawar shows big mistake of Narendra Modi in 5 state Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.