महाराष्ट्रातील 'या' सात नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 10:10 PM2019-05-30T22:10:39+5:302019-05-30T22:42:00+5:30

महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. 

The seven leaders of Maharashtra are in the position of Modi's cabinet | महाराष्ट्रातील 'या' सात नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

महाराष्ट्रातील 'या' सात नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

Next

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत जवळपास 58 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत. 

1) नितीन गडकरी 
भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा पराभव केला होता. मोदी सरकार -1 मध्ये त्यांनी मंत्रिपद देण्यात आले होते. यावेळीही म्हणजेच मोदी सरकार -2 मध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे.

2) प्रकाश जावडेकर 
भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनाही मोदी सरकार -2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता मोदी सरकार -2 मध्ये प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

3) पीयूष गोयल
मुंबईतील भाजपचे नेते पियुष गोयल यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी मोदी सरकार -1 मध्ये रेल्वेमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. तसेच, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री म्हणून मागील अर्थसंकल्प संसदेत सादर केला होता. त्यामुळे आता मोदी सरकार -2 मध्ये कोणत्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार, याकडे पाहावे लागेल.  

4) अरविंद सावंत 
मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार झालेले शिवसेनेचे अरविंद सावंत यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे मोदी सरकार-2 मध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रीपद मिळाले आहे. 

5) रावसाहेब दानवे 
महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचीही मोदी सरकार -2 मध्ये वर्णी लागली आहे. त्यांनी आज शपथविधी सोहळ्यात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, रावसाहेब दानवेंना मोदी सरकार -1 मध्ये राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, त्यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

6)  रामदास आठवले 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पुन्हा राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. गेल्यावेळी मोदी सरकार-1 मध्ये त्यांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

7) संजय धोत्रे 
अकोल्यातील भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Web Title: The seven leaders of Maharashtra are in the position of Modi's cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.