ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 19 - हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्याचा निर्णय जाहीर होताच काल संपूर्ण देशात एकच आंनदोत्सव साजरा झाला. देशाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या प्रकरणात पहिल्या फेरीत विजय मिळाल्याने अनेकांना मनापासून आनंद झाला. सरकारमधील मंत्रालये, सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांनी लगेचच सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 
 
सोशल मीडियावर सक्रीय असणारे विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफही या आनंदोत्सवात मागे नव्हते. त्यांनीही लगेचच टि्वटरवरुन देशभक्तीची भावना व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय कोर्टाचे आभार मानले. 
 
पण सेहवाग आणि कैफचे हे टि्वट पाकिस्तानमधील सोशल मीडिया युझर्सना पचवता आले नाही. त्यांनी दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली. तुम्ही कमी बुद्धीचे आहात. अजून अंतिम निर्णय आलेला नाही. आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली असली तरी, आम्ही फासावर लटकवणार, जिथे जायचे आहे तिथे जा असे एका युझरने म्हटले होते. त्यावर हजरजबाबी सेहवागने आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले.