साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोग कारवाईच्या तयारीत? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 10:47 AM2019-05-17T10:47:39+5:302019-05-17T10:48:29+5:30

नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Sadhvi Pragya Singh's troubles increase; Election Commission ready to take action? | साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोग कारवाईच्या तयारीत? 

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोग कारवाईच्या तयारीत? 

Next

भोपाळ - नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली होती. मात्र साध्वींच्या या वक्तव्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून, निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. 

दक्षिणेतील अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असा दावा केला होता. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहील, असे विधान केले होते. त्यानंतर वादास तोंड फुटले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यापासून अंतर राखताना त्यांना माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली होती. 

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अहवालामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानकारक टिप्पणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान अशांतता निर्माण होऊ शकते, असे मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या अहवालात नमूद केल्याचे वृत्त आहे. 

मात्र नथुरामबाबतच्या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागितली होती.  'हे माझं वैयक्तिक मत आहे. मी रोड शोमध्ये होते त्यावेळी जाताना मी हे उत्तर दिलं आहे. माझ्या भावना तशा नव्हत्या. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. गांधीजींनी देशासाठी जे केलं आहे ते विसरता येणार नाही. मी त्यांचा सन्मान करते. मी पक्षाच्या शिस्तीचं पालन करते. जी पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका माझी आहे' असे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी माफी मागताना म्हटले होते. 

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. मात्र उमेदवारी मिळाल्यापासूनच साध्वी प्रज्ञा सिंह या त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. 

Web Title: Sadhvi Pragya Singh's troubles increase; Election Commission ready to take action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.