ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये एका खात्यामध्ये 246 कोटी रुपये भरण्यात आल्याचे आढळलेते ही बँकेची कामाची वेळ संपल्यानंतर असे एका अधिकाऱ्याने सांगितलेनोटाबंदीनंतर जमा करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी रक्कम

चेन्नई, दि. 9 - नोटाबंदी केल्यानंतरच्या काही दिवसांमध्ये तामिळनाडू विभागातील एका बँक खात्यात एकाच वेळी 246 कोटी रुपये जमा केल्याचा प्रकार प्राप्तीकर खात्याच्या लक्षात आला आहे. हे काळे धन एका राजकीय नेत्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या व बँकेत त्या जमा करण्यासाठी 8 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरची मुदत देण्यात आली. या काळात लाखो खात्यांमध्ये काही हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे करण्यासाठी जमा करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून एकाच खात्यात 246 कोटी रुपये जमा करणे हा त्यातलाच प्रकार असण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूमध्ये असंही लक्षात आलं आहे की 441 खात्यांमध्ये 240 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. परंतु या खातेदारांची बँकांकडे नीट माहिती नसल्याचे समोर आले आहे. मोठ्या व संशयित रकमांच्या व्यवहारांची उकल करण्यासाठी प्राप्तीकर खात्याने जवळपास 27,739 खातेदारांना नोटिसा पाठवल्या आहेत.

विशेष म्हणजे एका खात्यामध्ये 246 कोटी रुपये भरण्यात आल्याचे आढळले व ते ही बँकेची कामाची वेळ संपल्यानंतर असे प्राप्तीकर खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीच्या काळात जमा करण्यात आलेल्या रकमांमधील ही सगळ्यात मोठी रक्कम असल्याचे तो म्हणाला. 
आम्ही या खातेदाराला नोटीस पाठवली आणि सदर खातेदार प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर व दंड भरण्यास तयार झाल्याचे प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संशयित आर्थिक व्यवहारांसदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्राप्तीकर खात्याला काही माहिती दिली असून त्याआधारे खात्यांच्या छाननीचं काम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 27,739 जणांना नोटिसा पाठवल्या असून 18,220 जणांकडून प्रतिसाद आला आहे. उरलेल्या सुमारे 9500 खातेदारांनी अनेक वेळा नोटिसा देऊनही प्रतिसाद दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या बँकांनी केवायसी किंवा नो युवर कस्टमर यांचे पालन केलेले नाही त्यांना ग्राहकाची ओळख पटवण्यात समस्या येत असून बँकांनी अशा प्रकरणांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी असेही सांगण्यात येत आहे. बँकांच्या अधिकाऱ्यांनी काही ग्राहकांना काला पैसा बेनामी खात्यात ठेवण्यास मदत केली असावी असा संशय आहे. सुमारे 3,600 कोटी रुपयांची रक्कम होईल इतकी संशयित खाती छाननीत आढळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटाबंदीनंतर ज्यांनी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात भरली आहे, अशांची आता छाननी करण्यात येत आहे.