जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर शहरात लाल बाजारात राहणाऱ्या जुफा इकबाल (१७) हिने घरात फरशीवरील सजावटीसाठी वापरण्यात येणारे गालिचे तयार करण्याचे रोलिंग मशीन बनवले आहे. जुफा म्हणाली की, ‘मी जेव्हा श्रीनगरच्या प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होती त्यावेळी एका कार्यक्रमानिमित्त मला एक प्रकल्प तयार करायचा होता. आम्ही काश्मीर विद्यापीठात गेलो. ते म्हणाले की, अशी वस्तू बनवा की, तिचा लोकांना उपयोग होईल. त्यानंतर मी दूरचित्रवाणी वाहिनीवर या उद्योगाशी संबंधित माहितीपट बघत होते व नंतर मी हे यंत्र बनवण्याचे काम सुरू केले.
ती म्हणाली की, हे काम मी सुरू केले त्यावेळी मला ते कसे बनवायचे हे माहीत नव्हते. सगळ्यात आधी मी ते कार्डबोर्डवर बनवले. मग मी जे लोक नमदा (गालिचा) बनवायचे त्यांच्याकडे गेले व ते व्यवस्थित समजून घेऊन काम सुरू केले. हाताने नमदा बनवायला जवळपास पाच तास लागतात.’ जुफाने म्हटले की, तिने जे यंत्र बनवले आहे त्यामुळे कमी वेळेत नमदा तयार करता येऊ शकेल. या यंत्राला मोटार असते व ती विजेवर चालते. नमदाचा कच्चा माल या रोलिंग यंत्रात घालून तयार नमदाबाहेर येतो.’ जुफाला प्रत्येक ठिकाणी न्यायाधीशांसमोर या यंत्राने बनवलेले नमुने सादर करावे लागले आहेत. जुफा म्हणाली की, ‘लोक मला विचारायचे की, तू कुठल्या विचारांत गुंग आहे?. तुला जे पाहिजे ते काही होणार नाही. माझे बालपणापासून स्वप्न होते की, मी असे काही काम करावे की, सगळ्यांनी मला वृत्तपत्रांत व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बघावे. ते तसे काही मी आता करून दाखवले आहे.’ जुफाला या यंत्रासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २०१६ मध्ये तिला एपीजे अब्दुल कलाम अवॉर्डही दिला गेला. जुफाचे वडील शेख अहमद इकबाल म्हणाले की, त्यांनी जुफाचा अभिमान आहे.
मुलींनी पुढे पडण्यावर जुफा म्हणाली की, मुली काही करू शकणार नाहीत हे समजण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आता केवळ काश्मीरच नाही तर सगळ्या जगातील मुली पुढे येत आहेत. श्रीनगरमधील क्राफ्ट डिझायनिंग इन्स्टिट्यूटचे फॅकल्टी मेंबर यासीर अहमद म्हणाले की, ‘जुफाने बनवलेले यंत्र काश्मीरमध्ये प्रथमच तयार झाले आहे. या यंत्रामुळे या उद्योगातील लोकांना फायदा होईल.’