प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

By aparna.velankar | Published: January 24, 2019 03:45 PM2019-01-24T15:45:25+5:302019-01-24T15:46:10+5:30

कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल,

The rise of Priyanka is not a defeat of Rahul Gandhi - Sachin Pilot | प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

प्रियंकांचा उदय हा राहुल गांधींचा पराभव नव्हे, सचिन पायलट यांनी सुनावले

Next
ठळक मुद्देप्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेलयोगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी या दोघांंमध्ये निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा सुजाण नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही

- अपर्णा वेलणकर

डिग्गी पैलेस, जयपूर -  ‘‘प्रियंका गांधी यांची पक्ष संघटनेतली नेमणूक राहुल गांधी यांच्या सहीने झाली आहे; त्यामुळे प्रियंकांचा उदय हा राहुल यांचा पराभव असल्याची फोल समीकरणे कुणीही मांडू नयेत’ असे सुनावत राजस्थानचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कॉंग्रेस पक्षातला प्रियंकांचा सक्रीय सहभाग हा येत्या तीन महिन्यातला सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ठरेल, अशी खात्री व्यक्त केली आहे.
जागतिक साहित्य-विश्वात मानाचे स्थान प्राप्त केलेल्या ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’च्या उदघाटनाच्या दिवशी एका विशेष सत्रात ते बोलत होते.

‘‘भारतीय मतदारांचा चेहरा, त्यांच्या अपेक्षा आणि आक्षेप हे सारेच आता बदलले आहे. घराणेशाहीचे जुने आरोप, उध्दट राष्ट्रवादाचा क्रूर चेहेरा आणि कंठाळी राजकीय चर्चांच्या कलकलाटापलीकडे जाऊन वर्तमानासाठी निवड करण्याचे नवे निकष देशातल्या मतदारांनी तयार केले आहेत. योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी या दोघांंमध्ये निवड करण्याची वेळ येईल; तेव्हा सुजाण नागरिकांचा कल कोणाकडे असेल हे ओळखण्यासाठी राजकीय पंडित असण्याची गरज नाही’ असेही पायलट यांनी सांगितले.

प्रियंका गांधी यांच्या प्रवेशामुळे उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या युतीला फटका बसून भाजपाच्या विरोधातली मते फुटतील आणि विरोधकांच्या एकीतली हवा निघून जाईल, हे गृहितक पायलट यांनी स्पष्टपणे फेटाळले. प्रियांका यांच्यामुळे देशातील राजकारणाला एक सकारात्मक वळण मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

डिग्गी पैलेसच्या चारबाग हिरवळीवर सुप्रसिध्द पत्रकार श्रीनिवासन जैन यांनी पायलट यांची मुलाखत घेतली, तेव्हा या तरुण नेत्याने माध्यमांनाही चार शब्द सुनावताना मागेपुढे पाहिले नाही. देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत, पण निवडणुकीच्या तोंडावर उभ्या असलेल्या सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेतली माध्यमे मात्र कोणी जानवे घातले, कोणाचे गोत्र कोणते, कोण मंदिरात गेले आणि कोण मशिदीत असल्या प्रश्नांवर तासनतासाच्या फुटकळ चर्चा लढवण्यात गर्क आहेत. यात सगळ्यांचाच वेळ फुकट चालला आहे आणि पत्रकारितेच्या नावाखाली डोकेदुखी बोकाळली आहे, असे सचिन पायलट यांनी ठासून सांगीतले; तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. या मुलाखतीला जगभरातून आलेल्या तरुण साहित्य रसिकांची मोठी गर्दी होती, हे विशेष!



 

Web Title: The rise of Priyanka is not a defeat of Rahul Gandhi - Sachin Pilot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.