सात महिन्यांमध्ये आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 09:32 AM2019-06-24T09:32:59+5:302019-06-24T09:57:27+5:30

कार्यकाळ संपण्यास 6 महिने शिल्लक असताना राजीनामा

Rbis Deputy Governor Viral Acharya resigns Six Months Before His Term Ends | सात महिन्यांमध्ये आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

सात महिन्यांमध्ये आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

googlenewsNext

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला आहे. आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक होता. 2017 मध्ये आचार्य आरबीआयच्या सेवेत दाखल झाले होते. आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे. त्याआधी डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.

विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्त्वाचे घटक होते. मात्र त्यांनीही पटेल यांच्या प्रमाणेच कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला. 23 जानेवारी 2017 रोजी आचार्य आरबीआयच्या सेवेत रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सरकारनं शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती केली. मात्र दास आणि विरल यांच्या मतांमध्ये बरंच अंतर होतं. पतधोरण निश्चित करण्यासाठी झालेल्या मागील दोन बैठकांमध्ये महागाई आणि विकास दर या मुद्द्यांवरुन दोघांचे मतभेद समोर आले होते. नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महसुली तुटीवरुन आचार्य यांनी मांडलेली मतं दास यांच्यापेक्षा वेगळी होती. 

विरल आचार्य न्यूयॉर्क विद्यापीठात अध्यापनाचं काम करणार असल्याचं वृत्त ईटीनं दिलं आहे. आचार्य यांचं कुटुंबदेखील न्यूयॉर्कमध्येच वास्तव्याला आहे. आरबीआयचे वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर एन. विश्वनाथन यांचा कार्यकाळदेखील लवकरच संपणार आहे. मात्र आचार्य यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता आहे. 1991 मध्ये देशात आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर अतिशय कमी वयात आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर होण्याचा मान विरल यांना मिळाला. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता राखणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. 

Web Title: Rbis Deputy Governor Viral Acharya resigns Six Months Before His Term Ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.