राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा 

By शिवराज यादव | Published: August 31, 2017 10:55 AM2017-08-31T10:55:15+5:302017-08-31T14:58:54+5:30

बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सोदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला सीबीआय विशेष न्यायालयातून पळवून नेण्याचा कट आखला गेला होता. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता

Ram Rahim had done full planning, a warning to the supporters of the Red Baga would be doing | राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा 

राम रहीमने केलं होतं पूर्ण प्लानिंग, समर्थकांना भडकवण्यासाठी लाल बॅगने करणार होता इशारा 

Next

चंदिगड, दि. 31 - बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सोदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला सीबीआय विशेष न्यायालयातून पळवून नेण्याचा कट आखला गेला होता. एकूण सातजणांनी मिळून राम रहीमला पळवून नेण्याचा कट आखला होता. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हरियाणाच्याच काही पोलिसांचाही समावेश होता. तर इतर दोनजण खासगी सुरक्षा रक्षक होते. मात्र या सातजणांची तिथे तैनात असलेल्या इतर पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना कटाचा अंदाज आल्यामुळे  राम रहीमला पळवण्याचा प्लान फसला. 

पोलीस महासंचालक के के राव यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे की, न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर लगेचच त्याने आपण आणलेली लाल बॅग देण्याची मागणी केली. सिरसाहून त्याने ती बॅग आणली होती. 'आपले कपडे बॅगेत असल्याचं सांगत त्याने बॅग मागितली. खरंतर तो त्याच्या समर्थकांसाठी एक सिग्नल होता. दोषी ठरवण्यात आल्यानंतर समर्थकांनी जास्तीत जास्त हिंसा करुन अडथळा निर्माण करावा यासाठी आखलेला तो कट होता', अशी माहिती के के राव यांनी दिली आहे. 

'जेव्हा गाडीतून राम रहीमची ती लाल बॅग बाहेर काढण्यात आली तेव्हा दोन ते तीन किमी अंतरावर अश्रू गॅसचे गोळे सोडल्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा आम्हाला ही लाल बॅग म्हणजे एक सिग्नल असल्याचं लक्षात आलं', असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

'यानंतर अजून एक संशयास्पद गोष्ट होती ती म्हणजे राम रहीम आणि त्याची दत्तक मुलगी बराच वेळ पंचकुला कोर्टाच्या कॉम्प्लेक्समध्ये उभे होते. त्यांना खरंतर तिथे उभं राहण्याची काहीच गरज नव्हती. पोलिसांच्या गाडीत उशिरा बसावं, ज्यामुळे समर्थकांना आपल्याला पोलिसांच्या गाडीतून नेण्यात येत असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवी हा यामागचा उद्देश होता. दोन ते तीन किमी अंतरावर जमाव होता, जो अजून जवळ येण्याची शक्यता होता. आम्हाला सेक्टर 1 मध्ये कोणतीही हिंसा नको होती', अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे. 

'पोलिसांनी राम रहीम ज्या गाडीतून आला त्यात बसू देता, डीसीपी सुमीत कुमार यांच्या गाडीत बसवण्याचा निर्णय घेतला. त्याला गाडीत बसवत असताना त्याच्या अंगरक्षकांनी गाडीला घेराव घातला. यानंतर सुमीत कुमार आणि त्यांच्या टीमची अंगरक्षकांसोबत वादावादी झाली. त्याच्या अंगरक्षकांना चांगलाच चोप देण्यात आला', असा दावा राव यांनी केला आहे. 

दुसरा एक महत्वाचा धोका पोलिसांना जाणवला तो म्हणजे राम रहीमच्या ताफ्यातून आलेल्या 70 ते 80 गाड्या. या सर्व गाड्या जवळच्या थिएटरजवळ पार्क करण्यात आल्या होत्या. या गाड्यांमधील लोकांनी  हत्यारं बाळगलं असल्याची भीती असल्याने पोलिसांनी त्या मार्गाने न जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे रस्ता बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांची सर्वात पहिली प्राथमिकता राम रहीमला चॉपर साईटवर घेऊन जाणे होता. पोलिसांनी लष्कर जवानांना विनंती करत कॅटोनमेंटच्या परिसरातून जाण्याची परवानगी देण्यास सांगितलं. पोलीस नेमक्या कोणत्या मार्गाने जात आहोत याबद्दल राम रहीमच्या समर्थकांना काहीच कळत नव्हतं.

इतके सारे धोके असतानाही पोलिसांनी अखेर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने राम रहीमला तुरुंगात नेलं. राम रहीमला पळवून नेण्याचा पुर्ण कट आखला गेला होता. पहिला म्हणजे जेव्हा त्याने लाल बॅग मागितली. दुसरा जेव्हा न्यायालयात उभं राहून त्यांनी वेळ घालवला. तिसरा म्हणजे ताफ्यातील 70 गाड्यांमध्ये असणारे लोक. 

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. दोषी ठरवल्यानंतर झालेला हिंसाचार लक्षात घेता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावण्यात आली. निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. राम रहीम याला बलात्काराच्या दोन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचबरोबर, राम रहीमला न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमधे प्रत्येकी 15 लाख रुपये याप्रमाणे 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या दंडाच्या रकमेतील दोन्ही पीडितांना प्रत्येकी 14 लाख रुपये देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, राम रहीम कोर्टरुममध्ये हात जोडून उभा असून दयेसाठी याचना करत होता. इतकंच नाही तर रडूही लागला होता.

Web Title: Ram Rahim had done full planning, a warning to the supporters of the Red Baga would be doing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.