Rajasthan Assembly Election Results : राजस्थानात कोमेजलं कमळ; जनतेनं केलं काँग्रेसला जवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 03:06 PM2018-12-11T15:06:19+5:302018-12-11T15:13:35+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला.

Rajasthan Assembly Election Results congress lead in rajasthan | Rajasthan Assembly Election Results : राजस्थानात कोमेजलं कमळ; जनतेनं केलं काँग्रेसला जवळ

Rajasthan Assembly Election Results : राजस्थानात कोमेजलं कमळ; जनतेनं केलं काँग्रेसला जवळ

Next

सुहास शेलार

जयपूर - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. दुपारी १.३० पर्यंत काँग्रेसने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपाचा रथ ८० जागांवर थांबलेला दिसून आला. बसपा ३, तर अपक्ष २० जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी चालून आली आहे. शिवाय गेल्या पंचवीस वर्षांपासूनची सत्ताबदलाची परंपरा राजस्थानी जनतेने कायम राखली आहे.

बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी या मुद्द्यांवरून राजस्थानातील सर्वसामान्य जनता विद्यमान वसुंधरा राजे सरकारवर नाराज आहे. याचा परिणाम थेट मतदानावर दिसून आला. शिवाय वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केलेली बंडखोरी भोवल्यामुळेच भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली आली आहे. भाजपाने यंदा ८० हून अधिक विद्यमान आमदार आणि ४ माजी मंत्र्यांना तिकिट नाकारले. त्यामुळे ऐनवेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतांचे ध्रुवीकरण झाले. आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

राजकीय विश्लेषक सांगतात, वसुंधरा राजे यांच्या संमती शिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाईल पुढे सरकत नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली होती. साहजिकच याचा फटका भाजपाच्या आमदारांना बसत होता. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. शिवाय २०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना मोठ्या प्रमाणात अपयश आले. रोजगार, आधुनिक शिक्षणाच्या सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्ली गल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. याचाही परिणाम मतदानावर झालेला दिसून आला.

भाजपाने यंदाच्या निवडणुकीत राजस्थानात विकासाच्या मुद्द्याला बगल देत हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला. उमेदवारी यादीतूनही हिंदुत्त्वाचीच झलक दिसून आली. भाजपाने आपल्या यादीत एकाही मुस्लीम उमेदवाराला स्थान दिले नाही. अगदी शेवटच्या क्षणाला यादीत फेरबदल करीत विद्यमान परिवहन मंत्री युनुस खान यांना संधी देण्यात आली. मात्र, दुपारपर्यंत युनुस खान ९ हजार मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्री सचिन पायलट यांना आव्हान देण्यासाठीच युनुस खान यांचा बळी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

२०१३च्या निवडणुकीत भाजपाने १६३ जागा जिंकत काँग्रेसचे पानीपत केले होते. त्यावेळी काँग्रेला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. राजस्थानी मतदारांचा तेव्हाचा कल पाहता भाजपा पुढची दहा वर्षे तरी सत्तेवर राहील, असे अंदाज होते. मात्र, वर्तमान निकाल पाहता राजस्थानसारखे मोठे राज्य हातातू निसटणे ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

Web Title: Rajasthan Assembly Election Results congress lead in rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.