ठळक मुद्देआम आदमी पक्षाचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा असून एका वाहिनीला मुलाखत देताना, "मी सुद्धा माणूस आहे, मलासुद्धा आकांक्षा आहेत. " असे थेट वक्तव्य केले होते.

नवी दिल्ली- रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेत जाण्याची संधी मिळण्याची शक्यता सूत्रांद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे दिल्ली विधानसभेत प्रचंड बहुमत असल्यामुळे या पक्षाला आपल्यातर्फे तीन सदस्य राज्यसभेत पाठवता येणार आहे.
गेले काही दिवस आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेत कोणाला पाठवायचे यावरुन चर्चा होत असून यावरुन पक्षामध्ये दोन मतप्रवाहही आहेत. काही नेत्यांनी आपल्याला राज्यसभेत जायचे आहे अशी इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे तर राजकारणाबाहेरील व्यक्ती राज्यसभेत पाठवल्या जाव्यात असाही मतप्रवाह पक्षामध्ये आहे. त्यामुळेच रघुराम राजन यांचे नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहे. आम आदमी पक्षाचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा असून एका वाहिनीला मुलाखत देताना, "मी सुद्धा माणूस आहे, मलासुद्धा आकांक्षा आहेत. " असे थेट वक्तव्य केले होते. त्यामुळे कुमार विश्वास यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार का हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.

आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेच्या जागांवरुन कुमार विश्वास आणि मनिष सिसोदिया, अरविंद केजरीवाल असे दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. कुमार विश्वास यांच्याबरोबर आपला मिळणाऱ्या राज्यसभेच्या तीन जागांमध्ये आशुतोष सिंग, संजय सिंहसुद्धा इच्छुकांच्या यादीमध्ये पुढे आहेत. कुमार विश्वास यांच्यावर रा. स्व.संघाचे एजंट असल्याचा तसेच ते भाजपाच्या वाटेवर असल्याचा आम आदमी पक्षातून नेहमी आरोप होत राहिला आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांना तिकीट नाकारून अरविंद केजरीवाल त्यांची आणखी नाराजी ओढावून घेतात की त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाऊ देतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. आम आदमी पक्ष याच महिन्यात स्थापनेची पाच वर्षेही पूर्ण करत आहे.

जानेवारी 2018 मध्ये राज्यसभेच्या दिल्लीमधील तीन जागा भरल्या जाणार असून विधानसभेत बहुमत असल्यामुळे या तिन्ही जागा आम आदमी पक्षाला मिळणार आहेत. आता रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाने खरेच राज्यसभेची संधी दिली तर ते त्यावर कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.