Rahul Gandhi is the President; Today's formal announcement | राहुल गांधीच अध्यक्ष; आज औपचारिक घोषणा

हरीश गुप्ता
नवी दिल्ली : काँगे्रसच्या अध्यक्षपदासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सर्वोच्च पदासाठी बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झाले आहे. राहुल यांच्याकडे १९ वर्षांनंतर आई सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेसची धुरा येणार आहे. या निवडीची औपचारिक घोषणा उद्या, मंगळवारी होईल. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज केलेला नाही.
अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधी (४७) यांनी आई सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केला. राहुल गांधी सकाळी २४, अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात गेले. येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित आणि मोहसिना किडवई यांची त्यांनी भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव देणाºया सोनिया गांधी या पहिल्या नेत्या आहेत.

भाजपामधून अपेक्षित टीका
या निवडणुकीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सभेत हे तर ‘औरंगजेब राज’ असल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचेच नेते शहजाद पूनावाला यांनी निवडणूक प्रक्रियेलाच विरोध दर्शवीत ही निवडणूक नाही तर निवड असल्याची टीका केली होती.
मोदी यांनी पूनावाला यांची प्रशंसा केली. आतापर्यंत पूनावाला यांच्यावर भाजपाचे नेते सतत टीका करीत.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही पक्षांतर्गत लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.