ठळक मुद्देगुरमीत राम रहीमवर हत्येचे दोन आरोप असून, सीबीआय 16 डिसेंबर रोजी आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहेहत्येच्या दोन्ही प्रकरणात राम रहीम आणि सीबीआयच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर लवकरच निर्णय येण्याची शक्यता गुरमीत राम रहीमवर पत्रकार राम चंदर छत्रपती आणि डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा आरोप

चंदिगड, दि. 29 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. गुरमीत राम रहीमवर हत्येचे दोन आरोप असून, सीबीआय 16 सप्टेंबर रोजी आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहे. म्हणजेच हत्येच्या दोन्ही प्रकरणात राम रहीम आणि सीबीआयच्या वकिलांनी आपली बाजू मांडल्यानंतर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. सोमवारी न्यायालयाने राम रहीमला बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर बलात्काराचे दोन आरोप असल्याने प्रत्येकी 10-10 वर्ष शिक्षा सुनावण्यात आली. 

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात विशेष सीबीआय न्यायालयाला पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या हत्याप्रकरणी तीन आठवड्यात सुनावणी पुर्ण करण्याचा आदेश दिला होता. पत्रकार राम चंदर छत्रपती यांनी राम रहीमविरोधातील बलात्कार प्रकरणाची चौकशी केल्याने तसंच पीडित साध्वीचं पत्र वृत्तपत्रात छापल्याने राम रहीमच्या आदेशानंतर डेराच्या लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. डेरा सच्चा सौदाचे व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्याप्रकरणातील सुनावणी देखील अंतिम टप्प्यात आहे. 

राम रहीमला बलात्कार प्रकरणी शिक्षा झाल्याने एकाप्रकारे सीबीआयची बाजू भक्कम होण्यास मदत झाली आहे. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीमच्या चरित्रासंबंधी युक्तिवाद केला जाईल. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'सुनावणीदरम्यान आरोपीचं चरित्रदेखील महत्वाचं असतं. जर आरोपीचं चरित्र संशयित असेल तर त्याच्याविरोधातील पुराव्यांनी बळ मिळतं. राम रहीमवर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. यासंबंधी अखेरचा युक्तिवाद केला जाईल'.

राम रहीमविरोधातील सुनावणी उशिराने करण्यात यावी यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात 60 हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सीबीआयच्या वकिलांनी विरोध केल्यानंतर उच्च न्यायालयाने सर्व याचिका रद्द केल्या होत्या. उच्च न्यायालयाकडून ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुर्ण करण्याचं ठरवलं आहे. मात्र सीबीआयला सप्टेंबरमध्येच ऑर्डर मिळेल अशी अपेक्षा आहे. याआधी सर्व प्रकरणांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत होती. मात्र आता राम रहीम जेलमध्येच बंद असल्याने रोहतक कारागृहात सुनावणी होऊ शकते. यासाठी कारागृहातच विशेष सीबीआय न्यायालय तयार केलं जाऊ शकतं. हत्येच्या आरोपातील कमीत कमी शिक्षा जन्मठेप आणि जास्तीत जास्त शिक्षा फाशी आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.