Pulwama Attack: राजनाथ सिंहांनी वाहिली श्रद्धांजली; शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 04:24 PM2019-02-15T16:24:00+5:302019-02-15T16:34:20+5:30

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह काश्मीरमध्ये

Pulwama Terror Attack Union Ministers Rajnath Singh Lend A Shoulder To Mortal Remains Of A Crpf Soldier | Pulwama Attack: राजनाथ सिंहांनी वाहिली श्रद्धांजली; शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

Pulwama Attack: राजनाथ सिंहांनी वाहिली श्रद्धांजली; शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

Next

श्रीनगर: पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. काल अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं. या सर्व जवानांना आज बडगाममध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आता या जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना खांदा दिला. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावर जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पुलवामामधील अवंतीपुरात झालेल्या हल्ल्यामागे असणाऱ्यांना सोडणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. या हल्ल्याचा आणि जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला जाईल, अशा शब्दांमध्ये त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. यानंतर आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी जवानांना कारवाई करण्यास पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचं म्हटलं. पाकिस्ताननं अधोगतीचा मार्ग निवडला आहे. दहशतवादी हल्ला करुन त्यांनी घोडचूक केली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही, असं मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी झाशीतील एका जनसभेला संबोधित करताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. 'पुढील कारवाईची काळ, वेळ आणि त्या कारवाईचं स्वरुप ठरवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य सुरक्षा दलांना देण्यात आलं आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती तोळामासा झाली आहे. मात्र तरीही त्यांच्याकडून दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्यांच्या या कारवायांना देशातील 130 कोटी जनता चोख प्रत्युत्तर देईल,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावलं. 

काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Pulwama Terror Attack Union Ministers Rajnath Singh Lend A Shoulder To Mortal Remains Of A Crpf Soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.