'ते' हिंदू संस्कृतीच्या विरोधात; रेल्वेच्या 'त्या' सेवेला भाजपा खासदाराचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:12 PM2019-06-13T20:12:08+5:302019-06-13T20:13:56+5:30

भाजपा खासदाराचं रेल्वे मंत्र्यांना पत्र

Providing Massage Services in railways Against Indian Culture Indore MP Writes to Piyush Goyal | 'ते' हिंदू संस्कृतीच्या विरोधात; रेल्वेच्या 'त्या' सेवेला भाजपा खासदाराचा विरोध

'ते' हिंदू संस्कृतीच्या विरोधात; रेल्वेच्या 'त्या' सेवेला भाजपा खासदाराचा विरोध

Next

इंदूर: प्रवाशांना मसाज सुविधा देण्याची घोषणा करणाऱ्या रेल्वेवर भाजपा खासदारानं टीका केली आहे. मसाज सुविधा भारतीय संस्कृती विरोधात असल्याचं इंदूरचे खासदार शंकर ललवानींनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना पत्रदेखील लिहिलं आहे. महिलांच्या समोर अशा प्रकारची सेवा देणं संस्कृतीत बसत नसल्याचं ललवानींनी पत्रात नमूद केलं आहे. 

पुढील दोन आठवड्यांमध्ये इंदूरमधून सुटणाऱ्या 39 गाड्यांमध्ये मसाजची सुविधा पुरवण्यात येईल, अशी घोषणा गेल्याच आठवड्यात रेल्वेनं केली. यासाठी पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागानं प्रस्ताव दिल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सेवेतून वर्षाकाठी 20 लाखांचं उत्पन्न मिळेल, अशी आशा रेल्वेला आहे. मात्र रेल्वेच्या या सुविधेला विरोध करत ललवानींनी भाजपाला घरचा आहेर दिला.

महिलांसमोर अशा प्रकारची सेवा देणं भारतीय संस्कृतीत बसतं का, असा प्रश्न ललवानींनी  रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे. रेल्वेत प्रवाशांना प्रथमोपचार पुरवणं, डॉक्टर उपलब्ध करणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणं गरजेचं नाही, असं आपलं मत असल्याचं ललवानींनी 10 जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  

रेल्वेकडून गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम अशा तीन प्रकारात मसासची सुविधा देण्यात येणार आहे. गोल्ड प्रकारात नॉन स्टिकी किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करण्यात येईल. यासाठी 100 रुपये आकारले जातील. डायमंड प्रकारात एसेन्शियल ऑईल वापरलं जाईल. त्यासाठी 200 रुपये शुल्क असेल. तर प्लॅटिनम मसाजमध्ये क्रीमचा वापर करण्यात येईल. यासाठी 300 रुपये आकारण्यात येतील. 15 ते 20 मिनिटं ही सेवा पुरवली जाईल.  
 

Web Title: Providing Massage Services in railways Against Indian Culture Indore MP Writes to Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.