priyanka gandhi roadshow thieves steal dozens mobile phones congress leader sitting on dharna | प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास; काँग्रेस नेत्यांचं धरणं आंदोलन
प्रियंका गांधींच्या रॅलीत कार्यकर्त्यांचे मोबाईल लंपास; काँग्रेस नेत्यांचं धरणं आंदोलन

ठळक मुद्देकन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. रोड शोमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचे महागडे स्मार्टफोन चोरीला गेले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

लखनौ - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी (11 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे केलेला रोड शो सुपरहिट झाला. त्याबरोबरच प्रियंका गांधी यांची प्रत्यक्ष राजकारणातील एंट्रीही दणक्यात झाली. प्रियंका यांच्या रोड शोमुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. या प्रचंड गर्दीचा चोरांना मात्र मोठा फायदा झाला आहे. रोड शोमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचे महागडे स्मार्टफोन चोरीला गेले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

कन्नौज आणि बाराबंकी येथून अनेक कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोड येथे पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांचे स्मार्टफोन आणि अन्य महत्त्वाचे सामान चोरले. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. चोरांनी सव्वा लाखाचा स्मार्टफोन चोरी केल्याचा दावा  शान अल्वी यांनी दावा केला आहे.  तसेच चोरांनी अनेक नेत्यांच्या खिशातील हजारो रुपये, लायसन्स आणि एटीएम कार्डसहित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. चोरी झाल्याची माहिती मिळताच संतप्त काँग्रेस नेत्यांनी एका तरुणाला मारहाणदेखील केली. तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात गेले आणि धरणे आंदोलनाला सुरुवात केली. मात्र तरीही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. 

प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे तसेच त्यांनी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी स्वीकारल्याने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे. 'बदलाव की आंधी, प्रियंका गांधी' अशा घोषणा रोड शो दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. याशिवाय लखनौमध्ये प्रियंका आणि राहुल गांधींचे पोस्टरदेखील लावण्यात आले होते. प्रियंका यांच्या रोड शोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह खासदार ज्योतिरादित्य सिंधियादेखील उपस्थित होते. सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. या रोड शो दरम्यान राहुल यांनी पुन्हा एकदा राफेल विमान कराराचा मुद्दा उपस्थित केला. राहुल आणि प्रियंका बसमधून रोड शो करत असताना  त्यांच्या हातात राफेल विमानाचं कट आऊट पाहायला मिळालं. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणाबाजी केली. 

प्रियंका गांधी यांच्या सक्रियतेनंतरही उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान असणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची संघटना खूपच कमकुवत आहे. 1989 साली उत्तर प्रदेशच्या सत्तेतून बाहेर झाल्यानंतर काँग्रेस पक्ष राज्यात उत्तरोत्तर कमकुवत होत गेला आहे. सध्या उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या केवळ 7 जागा त्यांच्याकडे आहेत. उत्तर प्रदेशात दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार बसपा आणि सपा या प्रादेशिक पक्षांकडे वळला आहे. तर सर्वण मतदार दीर्घकाळापासून भाजपाच्या मागे उभा आहे. त्यामुळे पक्षापासून दुरावलेल्या मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळवताना प्रियंका गांधी यांची कसोटी लागणार आहे. 2022 साली होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार करण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र राज्यात आधीच भक्कम असलेला भाजपा आणि आता नव्याने झालेली सपा-बसपा महाआघआडी यांना शह देण्यासाठी प्रियंका गांधी यांना मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणीचे काम हाती घ्यावे लागणार आहे.
 

English summary :
Congress president Rahul Gandhi and general secretary Priyanka Gandhi on Monday (February 11) attended the roadshow in Uttar Pradesh's capital Lucknow. When the Congress leaders and activists reached Kanpur Road, thieves stole their smartphones and other important things


Web Title: priyanka gandhi roadshow thieves steal dozens mobile phones congress leader sitting on dharna
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.