ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 17- देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सकाळी 10 वाजता संसदेत मतदान केले. भाजपाच्या नेतृत्वाखाली रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडून प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून, विजयासाठी 5,49,442 आवश्यक आहे. राम नाथ कोविंद सहज आणि चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला आहे. 
 
राष्ट्रपतिपदाचे रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद ६२ टक्क्यांहून अधिक मतांसह सहजपणे निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे. तथापि, त्यांच्या मतांची टक्केवारी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना २०१२ मध्ये मिळालेल्या ६९ टक्के मतांहून कमी असेल. 
राष्ट्रपतिपदासाठी पहिल्यांदाच दलित विरुद्ध दलित अशी लढाई होत आहे. आकडे भाजपच्या बाजूने असून, त्यांच्या उमेदवाराला जवळपास सात लाख मते मिळू शकतात. ही संख्या १० लाख ९८ हजार ९०३ मतांच्या सुमारे दोन तृतीयांश आहे.
 
 
रामनाथ कोविंद यांच्या बाजूने-
भाजपा, शिवसेना, पीडीपी, टीआरएस, अण्णाद्रमुक, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, जनता दल युनायटेड, तेलगु देसम पार्टी, लोकजनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, एजीपी, एनपीपी, अपना दल.
 
मीरा कुमार यांच्या बाजूने-
काँग्रेस, तृणमूल, माकपा, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, बसपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, जेएमएम, डीएमके, एआययूडीएफ
 
लढाई लढावीच लागेल-
राष्ट्रपतिपदाची ही निवडणूक संकुचित, फूटपाडू व सांप्रदायिक विचारसरणीविरुद्धची लढाई आहे. संख्याबळ आमच्याविरुद्ध असले, तरी हा लढा निकराने द्यावाच लागेल. कारण अशा लोकांच्या दावणीला देश बांधू दिला जाऊ शत नाही. - सोनिया गांधी
 
एकही मत वाया घालवू नका-
या वेळची निवडणूक ऐतिहासिक आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीच्या प्रतिष्ठेचे भान राखले. ही आपल्या परिपक्व लोकशाहीची खरी उंची आहे. आता एकही मत वाया जाणार नाही, याची आपल्याला खात्री करायची आहे.- नरेंद्र मोदी