''राफेल'च्या चौकशीतून स्वतःला वाचवण्यासाठी सीबीआयचं 'महाभारत''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 11:38 AM2018-10-24T11:38:00+5:302018-10-24T12:02:27+5:30

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा गंभीर आरोप

Prashant Bhushan to challenge Alok Vermas removal as CBI chief in court | ''राफेल'च्या चौकशीतून स्वतःला वाचवण्यासाठी सीबीआयचं 'महाभारत''

''राफेल'च्या चौकशीतून स्वतःला वाचवण्यासाठी सीबीआयचं 'महाभारत''

Next

नवी दिल्ली: राफेल प्रकरणात मोदी सरकारच्या अडचणी वाढल्यामुळेच सीबीआयचं नाट्य घडवलं जात असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. सीबीआयमधील दोन शीर्षस्थ अधिकाऱ्यांना सरकारनं आज सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा समावेश आहे. यापैकी वर्मा यांना चुकीच्या पद्धतीनं पदावरुन हटवल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असून याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं भूषण यांनी सांगितलं. 




राफेल डीलमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याची कारवाई याच हालचालींचा एक भाग असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला. वादग्रस्त अधिकारी राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. 




CBI vs CBI: काय आहे नेमकं प्रकरण?, कशावरून घडलं महाभारत?

आलोक वर्मा यांच्यावरील कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केला. गुजरात केडरच्या राकेश अस्थानांची विशेष संचालकपदी नियुक्ती करण्यास वर्मा यांचा विरोध होता. राकेश अस्थाना यांच्यावर आधीपासूनच लाचखोरीचे आरोप आहेत. त्यांच्याविरोधात अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अस्थाना यांचा वाचवण्यासाठीच वर्मा यांना पदावरुन दूर करण्यात आलं. सरकारनं आता नागेश्वर राव यांची सीबीआयचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्याविरोधातही गंभीर आरोप आहेत, असं भूषण म्हणाले. राफेल प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी, अशी मागणी आम्ही केली होती. त्यानंतर आलोक वर्मा यांनी सक्रीय होऊन चौकशी सुरू केली. त्यामुळेच त्यांना पदावरुन हटवलं गेलं, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Prashant Bhushan to challenge Alok Vermas removal as CBI chief in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.